पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत (Petrol-Diesel Price Hike) आहेत. या विषयावर मंगळवारी संसदेत प्रश्न विचारला आला. दरम्यान, यावर उत्तर देताना पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी त्याची तुलना अमेरिका आणि ब्रिटनमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींशी केली.
"माझ्या मते भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या दोन आठवड्यात पाच टक्क्यांनी वाढली. याची वाढ केवळ भारतातच झाली नाही. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या दरम्यान अमेरिकेत पेट्रोलच्या किंमती ५१ टक्के, कॅनडामध्ये ५२ टक्के, जर्मनीत ५५, ब्रिटनमध्ये ५५, फ्रान्समध्ये ५० आणि स्पेनमध्ये ५८ टक्क्यांनी वाढल्या आहेत," असं हरदीपसिंग पुरी म्हणाले.
पेट्रोल ९.२० रुपयांनी वाढलं
महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून इंधन दरवाढ काही केल्या थांबत नाही. विशेष म्हणजे गेल्या दोन आठवड्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर दररोज काही पैशांनी वाढताना दिसत आहेत. त्यामुळेच मंगळवारी पेट्रोलचे दर तब्बल १२० रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहेत. देशातील ५ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर १५ दिवसांनी ही दरवाढ होण्यास सुरुवात झाली. या दरवाढीतून पेट्रोलच्या दरात तब्बल ९.२० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.