लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चिनी कर्जाच्या ओझ्याखाली पुरते दबलेल्या श्रीलंकेची आर्थिक स्थिती अत्यंत ढबघाईला आली असून, यामुळे तेथे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. सध्या येथे पेट्रोल २५४ तर डिझेल २१४ रुपये प्रति लीटरने मिळत आहे. त्यामुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या श्रीलंकास्थित उपकंपनीने श्रीलंकन रुपयाच्या प्रचंड अवमूल्यनामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत मोठी वाढ केली आहे. वाढलेले दर शुक्रवारपासून लागू झाले आहेत.
एका महिन्यात कंपनीने इंधनाचे दर वाढवण्याची ही तिसरी वेळ आहे. लंका इंडियन ऑइल कंपनीने (एलआयओसी) सांगितले की, डिझेलच्या किरकोळ किमतीत प्रति लीटर ७५ रुपये आणि पेट्रोलच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
भाव वाढवूनही मोठा तोटा
एलआयओसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज गुप्ता म्हणाले, सात दिवसांत, श्रीलंकन रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ५७ रुपयांनी घसरला आहे. याचा थेट परिणाम तेल आणि पेट्रोल उत्पादनांच्या आयातीवर झाला आहे. रशियाने, युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पाश्चात्य देश रशियावर निर्बंध लादत आहेत, त्यामुळे तेल आणि वायूच्या किंमतीही वाढत आहेत. गुप्ता म्हणाले, सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या चढ्या किंमतीमुळे आमचे मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे किंमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही. भाव वाढवूनही मोठा तोटा सहन करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.