नवी दिल्ली - अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजप सरकारच्या काळात पेट्रोल दरवाढ कुठल्याही परिस्थितीत थांबताना दिसत नाही. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. मुंबईत पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला आहे. मुंबईत शुक्रवारी पुन्हा पेट्रोलचे दर वाढले आहेत. सलग 11 व्या दिवशी ही वाढ होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 87.39 तर डिझेल 76.51 रुपयांवर पोहोचले आहे. पेट्रोलचे दर आज 48 पैशांनी तर डिझेलचे दर 55 पैशांनी वाढले आहेत.
पेट्रोलची दरवाढ सुरूच असल्याने सर्वसामन्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. मालवाहतूक वाढल्याने महागाईचा फटका नागरिकांना बसत आहे. गुरुवारी (6 सप्टेंबर) रोजी पेट्रोल 19 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 22 पैसे प्रति लिटर महाग झाले होते. त्यामुळे मुंबईत गुरुवारी पेट्रोल प्रति लिटर 86.91 तर डिझेल प्रति लिटर दर 75.96 रुपयांवर पोहोचले होते. खाद्यान्न, धान्य, भाजीपाला यांची वाहतूक डिझेलच्या वाहनाने होत असते. ही वाहतूक करणाऱ्या मालवाहतूकदारांनी डिझेल 68 रुपये प्रति लिटरवर असताना मालभाड्याचा दर निश्चित केला होता. डिझेल 74 रुपये होईपर्यंत आम्ही सहन करू, पण त्यानंतर भाडेदरात वाढीचा विचार करावा लागेल, असे मालवाहतूकदारांनी ‘लोकमत’ला सांगितले होते. दरम्यान, ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागत आहे. धान्ये, खाद्यान्न, भाजीपाला, प्रवास सारेच महागल्याने गोरगरिबांचे अर्थकारण कोलमडल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याचे कारण पुढे करीत तेल कंपन्यांनी दरवाढीचा धडाका लावला आहे.
Petrol & Diesel prices in #Delhi are Rs.79.99 per litre & Rs.72.07 per litre, respectively. Petrol & Diesel prices in #Mumbai are Rs.87.39 per litre & Rs.76.51 per litre, respectively. pic.twitter.com/iBdzvAB2rW
— ANI (@ANI) September 7, 2018