Join us  

गडबड झाली ना राव! स्कूटरची टाकी 5.5 लीटरची, पंपावर भरले 6 लिटर पेट्रोल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 2:14 PM

petrol pump : पेट्रोल पंपावर एकीकडे गाडीची टाकी  (Fuel Tank) पेट्रोलने भरत असताना दुसरीकडे खरेदीदाराच्या नजरा फक्त वाढत्या मीटरवर खिळल्याचे दिसून येत आहे.

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) गगनाला भिडले आहेत. खर्चाला आळा घालण्यासाठी लोकांनी इंधनाच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब ठेवण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोल पंपावर एकीकडे गाडीची टाकी  (Fuel Tank) पेट्रोलने भरत असताना दुसरीकडे खरेदीदाराच्या नजरा फक्त वाढत्या मीटरवर खिळल्याचे दिसून येत आहे.

पेट्रोलच्या बिलाचा हिशेब ठेवणाऱ्या अशाच एका व्यक्तीची थोडी गडबड झाली. कारण, ज्यावेळी पेट्रोल पंपावर त्याने पाहिले की, त्याच्या हिरो ड्युएट (Hero Duet) स्कूटरमधील 5.5 लिटरच्या टाकीमध्ये 6 लिटर पेट्रोल भरण्यात आले. याबाबत त्यांनी पेट्रोलियम मंत्रालयाला टॅग करत ट्विटरवर तक्रार केली आहे. हे प्रकरण झारखंडची राजधानी रांची येथील आहे. येथे एका व्यक्तीने पेट्रोलियम मंत्रालयाला टॅग करून ही समस्या सोडवण्याची विनंती केली. त्या व्यक्तीने लिहिले की हिरो ड्युएटची इंधन क्षमता (Fuel Capacity) 5.5 लीटर आहे, पण त्यात 6 लीटर पेट्रोल कसे भरता येईल. 

या तक्रारीला उत्तर देताना MoPNG ने म्हटले की, प्रिय ग्राहक, तुम्ही ज्या पेट्रोल पंपावरून इंधन भरले त्याची चौकशी करण्यात आली आहे. आम्हाला कोणतीही त्रुटी आढळली नाही. दरम्यान, वाहन कंपनीने सुचवलेली इंधन टाकीची क्षमता 5.5 लीटर आहे. परंतु वास्तविक इंधन टाकीची क्षमता यापेक्षा जास्त आहे. तसेच MoPNG ने सांगितले की, तुम्ही पेट्रोल पंपावर जाऊन इंधनाचे प्रमाण तपासू शकता.

दरम्यान, अशा घटनांमध्ये वाहनाच्या इंधन टाकीमुळे असे घडत असल्याचे दिसून येते, यामध्ये बहुतेक पेट्रोल पंपांची चूक नसते. हिरो ड्युएटची इंधन टाकीची क्षमता कंपनीने केवळ 5.5 लीटर असल्याचे सांगितले आहे. वाहन कंपन्या सामान्य क्षमतेपेक्षा 10 ते 15 टक्के अधिक क्षमतेच्या (Spare Capacity) इंधन टाक्या बनवतात.

टॅग्स :पेट्रोल पंपपेट्रोलजरा हटके