जालंधर - येथील एका पेट्रोल पंपावरील गोंधळाची राज्यभर चर्चा रंगली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेट्रोलमधील इथेनॉल पाणी बनले होते. त्यामुळे, नकोदर रोडवरील एका पेट्रोल पंपावर मोठा गोंधळ उडाला होता. ग्राहकांनी पेट्रोल पंप चालकावर, पेट्रोलमध्ये पाणी मिसळून भेसळयुक्त पेट्रोल विकत असल्याचा आरोप केला. त्यामुळे, पेट्रोल पंपाच्याखाली असलेल्या भूमीगत टँकमधील पाणी काढण्यासाठी हा पंप कंपनीकडून बंद ठेवण्यात आला.
नकोदर रोड, नारी निकेतन रस्त्यावरील पेट्रोल पंपावर बुधवारी पेट्रोल भरल्यानंतर गाडीच बंद पडल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे, काहींनी या घटनेचा तपास केल्यास येथील पेट्रोलमध्ये पाणी मिसळ असल्याची खात्री ग्राहकांना पटली. याबाबत पेट्रोलपंपाच्या कंपनीतील अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर रात्री 9.30 वाजता हा पंप बंद ठेवण्यात आला. याबाबत माहिती देताना पंपाचे संचालक गौरव यांनी म्हटले की, पेट्रोलमध्ये मिक्स इथेनॉलचे पाणी झाल्याने पेट्रोलमध्ये काही प्रमाणात पाणी भरले गेले आहे. त्यामुळे, ही समस्या उद्भवली असून कंपनीचे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिक्स करण्यात येते. त्यातच, पावसाचे पाणी जमिनीत खोलवर मुरल्यानंतर ते पेट्रोल पंपाच्या भूमीगत टाक्यांमध्ये शिरते. त्यामुळे, टाकीतील पेट्रोलमध्ये असलेले इथेनॉल हे पाणी बनते. इथेनॉलमध्ये थोड्या प्रमाणातही पाणी मिसळल्यास इथेनॉलचे पाणी बनते. त्यातून, हे प्रश्न उद्भवतात. त्यामुळे, ग्राहकांनीही पेट्रोल भरल्यानंतर गाडी बंद पडत असल्यास अगोदरच काळजी घ्यायला हवी. दरम्यान, पेट्रोप पंपचालक संघानेही अनेकदा कंपन्यांकडे किमान पावसाळ्यात तरी पेट्रोलमध्ये इथेनॉल न मिसळण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही त्याकडे लक्ष देण्यात आले नाही.