नवी दिल्ली : अमेरिकेत अलीकडेच आलेल्या चक्रीवादळामुळेच पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत, असा दावा यातील तज्ज्ञ करत आहेत. याशिवाय पेट्रोलियम पदार्थांवरील उत्पादन शुल्क आणि व्हॅटचे चढे दर यामुळे इंधन महागले असल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिती सामान्य झाल्यानंतर हे दर कमी होतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती काही काळापासून ५० ते ५५ रुपये डॉलर प्रति बॅरल आहेत. हा दर सामान्य दरापेक्षा कमी आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक दीड महिन्यात झालेली वाढ अमेरिकेतील वादळामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. आॅगस्टच्या दुसºया पंधरवाड्यात ह्यूस्टन, टेक्सासमध्ये वादळाने मोठे नुकसान झाले. त्यानंतर, सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात फ्लोरिडात इर्मा वादळ आले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पेट्रोल, डिझेलचे दर आता दररोज निश्चित होतात. पेट्रोलियम पदार्थांवर कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम होतो. कारण कच्च्या तेलापासूनच हे उत्पादन तयार होते, पण अलीकडील तेजी ही कच्च्या तेलामुळे नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्यामुळे आली आहे.
बुटोला यांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोलमधील ही दरवाढ अस्थायी आहे. अमेरिकेतील रिफायनरीमधील उत्पादन पुन्हा पूर्ववत होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होताच, भारतातही याचा परिणाम दिसू लागेल.
या कारणांमुळे झाली दरवाढ
इंडियन आॅइल कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष आर. एस. बुटोला यांनी सांगितले की, अमेरिकेतील वादळामुळे रिफाइनरी उत्पादन ठप्प झाले आहे. प्रति दिन दोन कोटी बॅरल उत्पादन क्षमतेच्या रिफायनरी येथे आहेत. यातून देशांतर्गत तेलाचा पुरवठा होतो आणि निर्यातही होते. वादळामुळे ३० ते ४० लाख टन उत्पादन क्षमता प्रभावित झाली आहे. यामुळे निर्यात मूल्य जूनमध्ये १.४४ डॉलर प्रति गॅलन (१ गॅलन म्हणजे ३.७८ लीटर) होते, ते आॅगस्टमध्ये वादळ येणार असल्याच्या वृत्ताने वाढून १.६२ डॉलर झाले आहे. वादळानंतर सप्टेंबरमध्ये वाढून १.८३ डॉलर प्रति गॅलनपर्यंत पोहोचले आहे. डॉलर-रुपयाचे दर आणि गॅलन-प्रति लीटर यांच्या हिशेबाने, याचा परिणाम ६ ते ७ रुपये प्रति लीटर एवढा झाला आहे.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीमागे उत्पादन शुल्क आणि राज्यांकडून आकारला जाणारा व्हॅट हेही कारण आहे. व्हॅटमुळेच मुंबईत पेट्रोल २३ सप्टेंबरपासून ७९.५३ रुपये आणि डिझेल ६२.३५ रुपये लिटर आहे. दिल्लीत व्हॅटचे दर महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल ७०.४२ रुपये आणि डिझेल ५८.६९ रुपये लिटर आहे. पेट्रोलवर सद्या २१.४८ रुपये प्रति लिटर प्रमाणे उत्पादन शुल्क लागते. दिल्लीत यावर २७ टक्क्यांनी व्हॅट आकारला जातो. डिझेलवर १७.३३ रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क केंद्र सरकार घेते. दिल्लीत डिलर कमिशनसह १६.७५ टक्के दराने व्हॅट वसूल केला जातो. विविध राज्यात व्हॅटचा दर वेगवेगळा आहे.
पेट्रोल लवकरच स्वस्त?, या कारणांमुळे झाली होती दरवाढ
अमेरिकेत अलीकडेच आलेल्या चक्रीवादळामुळेच पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत, असा दावा यातील तज्ज्ञ करत आहेत. याशिवाय पेट्रोलियम पदार्थांवरील उत्पादन शुल्क आणि व्हॅटचे चढे दर यामुळे इंधन महागले असल्याचे सांगितले जात आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 02:39 AM2017-09-25T02:39:37+5:302017-09-25T02:47:52+5:30