Join us

Electric Vehicles असलेल्यांना दिलासा; सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या उभारणार २२००० चार्जिंग स्टेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 11:45 PM

सध्या देशात मोठ्या प्रमाणात Electric वाहनांची निर्मिती आणि वापराच्या दिशेनं पाऊल टाकलं जात आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) आणि इतर दोन सरकारी पेट्रोलियम कंपन्या पुढील तीन ते पाच वर्षांत देशभरात सुमारे 22,000 इलेक्ट्रीक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या तयारीत आहेत. यामुळे 2070 पर्यंत भारताचे निव्वळ-शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्यात मदत होणार आहे. आम्ही येत्या तीन वर्षांत सुमारे 10,000 पेट्रोल पंपांवर ईव्ही चार्जिंग सुविधा उभारू, अशी माहिती देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी IOC चे अध्यक्ष श्रीकांत वैद्य यांनी दिली.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) ने पुढील पाच वर्षांत 7000 आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने 3000 चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवामान बदल परिषदेत (COP-26) 2070 पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जनाचे भारताचे लक्ष्याकडे लक्ष वेधले होते. याव्यतिरिक्त, भारताने 2030 पर्यंत 50,000 मेगावॅट कमी-कार्बन उत्सर्जन असलेली वीज क्षमता गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारताच्या एकूण ऊर्जा गरजेपैकी 50 टक्के गरज अशाप्रकारे भागवण्याचं ध्येय ठेवले आहे.

बीपीसीएल, एचपीसीएलमध्येही असतील चार्जिंग स्टेशनआयओसीने पुढील वर्षापर्यंत सुमारे 2,000 चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याच वेळी, BPCL आणि HPCL याच कालावधीत प्रत्येकी 1,000 चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखत आहेत, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मंगळवारी दिली. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मोबिलिटी जॉइंट व्हेंचरने गेल्या महिन्यात बीपीसह महाराष्ट्रात पहिले रिटेल आउटलेट सुरू केले. ईव्ही चार्जिंग आणि बॅटरी स्वॅपिंग सुविधा देखील येथे उपलब्ध असेल. “आम्ही 7000 चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचे आणि वाढत्या इलेक्ट्रीक वाहन उद्योगाला मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही स्टेशन्स 'एनर्जी स्टेशन्स' म्हणून ओळखली जातील," अशी प्रतिक्रिया बीपीसीएलचे अध्यक्ष अरुण कुमार सिंग यांनी दिली.

प्रत्येक 25 किलोमीटरवर चार्जिंग स्टेशनदरम्यान, IOC प्रत्येक 25 किलोमीटरवर 50 kW EV चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना आखत आहे. कंपनी दर 100 किलोमीटरवर 100 किलोवॅट हेवी-ड्युटी चार्जर बसवणार आहे. “आमच्या सर्व रिफायनरीज उत्पादनाच्या दृष्टीने निव्वळ-शून्य उत्सर्जनाच्या दिशेने पावले टाकत आहेत. त्याबाबत लवकरच घोषणा आम्ही करू," असे वैद्य म्हणाले. "देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी मिशन म्हणून 22000 इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखली आहे,'' असं पुरी म्हणाले.

टॅग्स :वीजेवर चालणारं वाहनभारत