पेट्रोल, डिझेल (Petrol-Diesel) आणि एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किंमतीमुळे त्रासलेल्या सामान्य जनतेला आता लवकरच दिलासा मिळणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री (Union Petroleum Minister) धमेंद्र प्रधान यांनी पेट्रोल, डिझेल आणि घरगुती सिलिंडरच्या दरात मार्च किंवा एप्रिल महिन्यात कमी होतील, असं म्हटलं आहे. त्यांनी यामागचं कारण देखील सांगितलं आहे. तेल उत्पादक देशांना तेलाचं उत्पादन वाढविण्यास सांगण्यात आलं आहे जेणेकरुन भारतातील सामान्य जनतेला तेलाच्या वाढत्या किंमतीतून दिलासा मिळू शकेल. (Petrol Diesel and LPG Price May Fall By April 2021)
जगातील तेल उत्पादक देशांकडून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ केली जात असल्यानं देशात पेट्रोलियम पदार्थ महाग होत असल्याचं विधान धर्मंद्र प्रधान यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. आपल्या देशाला अधिक फायदा व्हावा या हेतूनंच तेल उत्पादक देश कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ करत आहेत, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले होते.
थंडीचा मोसम असल्यानं पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्याचंही विधान प्रधान यांनी केलं होतं. त्यावरुन विरोधकांच्या टीकेलाही प्रधान यांना सामोरं जावं लागलं होतं.
तेलाचं उत्पादन वाढल्यास किमती कमी होतील
कोरोनामुळं विक्रीत घट झाल्यानं तेल उत्पादक देशांनी उत्पादन कमी केलं होतं. पण आता परिस्थिती पूर्वपदावर येत असूनही तेलाचं उत्पादन पूर्वीसारखं रुळावर येऊ शकलेलं नाही. यामुळे एलपीजीच्या विक्रीत वाढ झाली आणि उत्पादन कमी होत असल्यानं किमतीत वाढ झाली. पण मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलमध्ये एलपीजीच्या दरांवर नियंत्रण मिळवता येईल, असं सांगण्यात येत आहे.
तेल उत्पादक देशांवर दबावनिर्मिती
भारत अनेक देशांकडून तेलाची खरेदी करतो. यात रशिया, कतार आणि कुवैतसह अन्य काही देशांचा समावेश आहे. या देशांवर भारताकडून तेलाचं उत्पादन वाढविण्यासाठीच्या दबावनिर्मितीचं काम केलं जात आहे. तेलाचं उत्पादन वाढलं तर आपोआप कच्च्या तेलाच्या प्रतिबॅरलची किंमत कमी होईल. त्यानंतर किरकोळ बाजारातही तेलाच्या किमतीत घट होईल, असा विश्वास सरकारनं व्यक्त केलं आहे.