नवी दिल्ली - या वर्षाच्या सुरुवातीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने देशभरातील वाहन चालकांचे गणित बिघडले आहे. देशातील काही शहरांमध्ये तर पेट्रोलचे दर १०० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहेत. (increase in petrol and diesel prices in India) मात्र पेट्रोलियच्या वाढत्या दरांसाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अजब कारण दिले आहे. हिवाळ्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत होत्या. मात्र आता हिवाळा संपत आल्याने इंधनाची मागणी कमी होऊन पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होतील, असा दावा धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. (Petroleum Minister, Dharmendra Pradhan Says, Rising fuel prices due to winter, prices will now be lower )
एएनआयशी संवाद साधताना धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीबाबत धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलियमच्या उत्पादनामुळे ग्राहकांवर परिणाम होत आहे. आता थंडी कमी होत आहे. त्यामुळे पेट्रोलियमच्या किमतीही कमी होतील. पेट्रोलियमच्या किमती हा एक आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे. थंडीमध्ये मागणी वाढल्यामुळे किमतींमध्ये वाढ झाली आहे. मात्र आता किमती कमी होतील.
धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, त्यांनी जीएसटी कौन्सिलला पेट्रोलिमय पदार्थांना जीएसटीच्या चौकटीत आणण्याचा आग्रह केला आहे. ते म्हणाले की, जर पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटीच्या चौकटीत आणले गेले तर सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तसेच देशातील तेल आणि गॅस क्षेत्राच्या विकासालाही मदत मिळणार आहे.