Join us

पेट्रोल डिझेलचे दर कमी होऊ शकतात; जाणून घ्या काय म्हणाले पेट्रोलियम मंत्री? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 5:50 PM

भाजप मुख्यालयात हरदीप सिंग पुरी यांनी पेट्रोलच्या किमतींबाबत भाष्य केले. 

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा विचार करू शकतील, असे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शनिवारी सांगितले. भाजप मुख्यालयात हरदीप सिंग पुरी यांनी पेट्रोलच्या किमतींबाबत भाष्य केले. 

यावेळी तेल कंपन्यांचे आगामी तिमाही निकाल चांगले असतील, असे ते म्हणाले. मात्र या विषयावर कोणतीही घोषणा करण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगत पुढे जाऊन काय करता येईल ते पाहू, असे हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले.

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी गेल्या तिमाहीत 'ठीक' कामगिरी केली. काही तोटा भरून काढला आहे. त्यांनी आपली कॉर्पोरेट जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली आहे. पुढे गेल्यावर काय करता येईल ते पाहू, असेही ते म्हणाले.  

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 22 एप्रिलपासून तेलाच्या किमती वाढणार नाहीत याची खात्री केली आहे. ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही याची सरकार यापुढे काळजी घेईल, असेही हरदीप सिंग पुरी म्हणाले.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दरपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लीटर, कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये व डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. 

टॅग्स :पेट्रोलडिझेल