नवी दिल्ली : आपल्याच कर्मचाऱ्यांकडून वारंवार होणा-या कॅशबॅक घोटाळ्यांमुळे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म पेटीएम मॉलला जबर फटका बसला असून, तंत्रज्ञानाधिष्ठित घोटाळा प्रतिबंधक यंत्रणा विकसित करण्यासाठी कंपनीने अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) या कंपनीसोबत भागीदारी केली आहे.
पेटीएम मॉलने सोमवारी यासंबंधीची अधिकृत घोषणा केली. सातत्यपूर्ण तपासणी, संगनमताच्या प्रकरणांचा शोध घेणे व ती रोखणे आणि जागतिक पातळीवरील प्रचलित पद्धती वापरणे यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे.
एका राष्ट्रीय दैनिकात प्रसद्ध झालेल्या वृत्तानुसार, पेटीएम मॉलच्या काही कर्मचाऱ्यांनी बाह्य विक्रेत्यांशी हातमिळवणी करून बनावट आॅर्डर्स तयार केल्या आणि त्याआधारे कमिशन मिळविल्याचे अलीकडे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने ‘ईवाय’शी भागीदारी करार केला आहे.
अलीबाबा समर्थित पेटीएम मॉलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईवायसोबतच्या करारामुळे आम्हाला जगातील सर्वोत्तम पद्धतींची माहिती मिळेल, तसेच तंत्रज्ञानाधिष्ठित घोटाळा प्रतिबंधक यंत्रणा आम्ही उभारू शकू.
पेटीएम मॉलचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीनिवास मॉथे यांनी सांगितले की, आमची पथके ईवायसोबत काम करीत आहेत. आम्हाला एक विश्वसनीय वाणिज्य प्लॅटफॉर्म उभा करायचा आहे. त्यासाठी जेथे गरज पडेल तेथे आम्ही कठोर कारवाई करू. घोटाळेबाज व्यावसायिकांना आमच्या यादीवरून काढणेही आम्ही सुरूच ठेवले आहे.
कंपनीने म्हटले की, अॅडमिन, वित्त आणि इतर सहायक कार्यव्यवस्थेसोबतच कंपनीकडे व्यवसाय परिचालन पथकेही आहेत. ही पथके भागीदारीतील व्यावसायिकांशी कॅशबॅक प्रस्ताव आणि प्रचाराचे काम करतात. त्यातून संगनमताला वाव राहतो. त्या जागा हेरून त्यावर ईवायमार्फत उपाय शोधले जातील. तपासणी करणे आणि घोटाळे रोखणे यासाठी मानवी तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाईल.
कंपनीला २०१८मध्ये १,८०० कोटी रुपयांचा तोटा
गेल्या काही वर्षांपासून पेटीएमला आॅनलाईन रिटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. त्यावर कंपनीची काही मात्रा चालेनाशी झाली आहे. वित्त वर्ष २०१८ मध्ये कंपनीला ७७४ कोटींच्या महसुलावर १,८०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
पेटीएम मॉलचा बाजार हिस्साही अर्ध्याने घटून ३ टक्क्यांवर आला आहे. पेटीएम मॉलने आतापर्यंत अलिबाबा, सॉफ्टबॅक आणि सईफ पार्टनर्स यांच्याकडून ६५० दशलक्ष डॉलर उभे केले आहेत.
पेटीएम मॉलला कॅशबॅक घोटाळ्याचा जबर फटका
पेटीएम मॉलने सोमवारी यासंबंधीची अधिकृत घोषणा केली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 05:35 AM2019-05-14T05:35:31+5:302019-05-14T05:35:46+5:30