कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सीबीटीची बैठक होणार आहे. ही बैठक पीएफ खातेधारकांसाठी वाईट बातमी घेऊन येऊ शकते. सीबीटीच्या बैठकीत पीएफ व्याजदरात सुधारणा केली जाऊ शकते, असं वृत्त आहे. असं झाल्यास ६ कोटींहून अधिक पीएफ खातेधारकांना याचा फटका बसणार आहे. येत्या काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका पार पडणार पडणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
८ टक्के व्याजदराची शिफारस
इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ईपीएफओचे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) होणाऱ्या बैठकीत आर्थिक वर्ष २०२४ साठी सुमारे ८ टक्के व्याजदराची शिफारस करण्याची शक्यता आहे. याशिवाय, गुंतवणुकीवर परतावा वाढवण्यासाठी ईपीएफओ आता शेअर्समधील आपली गुंतवणूक सुमारे १० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी बोर्डाची मंजुरी घेण्याची देखील शक्यता आहे. या बैठकीत पेन्शन, अर्थसंकल्पीय अंदाज आणि अनुपालनाच्या मुद्द्यांवरही चर्चा होऊ शकते. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, सीबीटीच्या बैठकीत हायर पेन्शन, ईपीएफओमधील रिक्त पदांवर भरती आणि कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी यावर चर्चा होऊ शकते.
आता किती व्याज?
२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी, पीएफ खातेधारकांच्या ठेवींवर ०.०५ टक्के व्याजदर ८.१० टक्क्यांवरून ८.१५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. पीएफवरील व्याज दर ईपीएफ सदस्यांनी वर्षभरात काढलेले पैसे, ईपीएफ खात्यातून मिळालेले योगदान आणि वर्षभरात कमावलेल्या उत्पन्नाच्या आधारे निर्धारित केलं जातं.
केव्हा होणार घोषणा
भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर ताबडतोब जाहीर केला जाईल की नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार वित्त मंत्रालयाच्या परवानगीनंतर जाहीर केला जाईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गेल्या वर्षी जुलैमध्ये, कामगार मंत्रालयाने केंद्रीय विश्वस्त मंडळाला वित्त मंत्रालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय २०२३-२४ या आर्थिक वर्षातील व्याजदर जाहीर करू नये असे निर्देश दिले होते.