EPFO Rules change: गेल्या काही दिवसांत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (ईपीएफओ) संबंधित अनेक नियम बदलले आहेत. याचा परिणाम कोट्यवधी ईपीएफओ ग्राहकांवर होणारे. यातील एक नियम पीएफ क्लेमच्या प्रक्रियेशी संबंधित आहे, तर एक नियम पडताळणीशी संबंधित आहे. चला जाणून घेऊया सलग तीन नियमांविषयी.
फेस व्हेरिफिकेशनचे नियम
आता ईपीएफओचे सदस्य फेस व्हेरिफिकेशनद्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) आणि संबंधित सेवांचा लाभ घेऊ शकतात. नुकतंच केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी फेस व्हेरिफिकेशनद्वारे भविष्य निर्वाह निधी यूएएनचे जारी आणि त्याला सक्रिय करण्यासाठी अपग्रेडेड डिजिटल सर्व्हिसेसची सेवा सुरू केली आहे.
आता कर्मचारी उमंग मोबाइल अॅपच्या मदतीनं आधार फेस व्हेरिफिकेशन टेक्नॉलॉजी (एफएटी) वापरून थेट यूएएन तयार करू शकतात. कोणताही नियोक्ता कोणत्याही नवीन कर्मचाऱ्यासाठी आधार एफएटीचा वापर करून यूएएन तयार करण्यासाठी उमंग अॅपचा वापर करू शकतो. ज्या सदस्यांकडे आधीच यूएएन आहे परंतु अद्याप ते अॅक्टिव्हेट केलेलं नाही ते आता उमंग अॅपद्वारे सहजपणे त्यांचे यूएएन अॅक्टिव्हेट करू शकतात.
चेकच्या फोटोची गरज नाही
ईपीएफओनं पीएफच्या ऑनलाइन क्लेममध्येही बदल केले आहेत. इच्छुक अर्जदारांनी कॅन्सल्ड चेकचा फोटो अपलोड करण्याची आवश्यकता नाही आणि त्यांच्या बँक खात्यांची नियोक्त्यांनी पडताळणी करण्याची आवश्यकता नाही. सध्या ईपीएफओ सदस्यांना पीएफ खात्यातून ऑनलाइन पैसे काढण्यासाठी अर्ज करताना यूएएन किंवा पीएफ क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्याच्या चेक किंवा पासबुकची व्हेरिफाइड फोटोकॉपी अपलोड करावी लागते.
त्याचप्रमाणे नियोक्त्यांनी अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील मंजूर करणे बंधनकारक आहे. आता मालकांच्या बाबतीतही मंजुरीची गरज नाही. ईपीएफ सदस्यांसाठी 'ईज ऑफ लिव्हिंग' आणि नियोक्तांसाठी 'इज ऑफ डुइंग बिझनेस' सुनिश्चित करण्यासाठी या दोन अटी रद्द करण्यात आल्या आहेत.