नवी दिल्लीः कर्मचारीभविष्य निर्वाह निधीचा व्याजदर गेल्या काही दिवसांपूर्वीच 8.65 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे खात्यात जमा असलेल्या पैशांवरही चांगली वाढ होत आहे. ईपीएफओच्या वेबसाइटच्या माध्यमातूनही आपण जमा रकमेची माहिती मिळवू शकतो. तसेच ईपीएफओमध्ये नोंदणी असलेल्या मोबाइलवरून मिस कॉल्ड दिल्यावरही मेसेजद्वारे जमा रकमेची माहिती मिळते. परंतु आता उमंग अॅपद्वारेसुद्धा आपल्या खात्यात किती रक्कम जमा आहे ते समजणार आहे.लोकांना एका क्लिकवर सरकारी खात्यांशी संपर्क साधता आला पाहिजे, यासाठी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान खात्याने उमंग हे अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्राहक कर्मचारीभविष्य निर्वाह निधी, पॅन, आधार, डिजिलॉकर, गॅस बुकिंग, मोबाइल बिल पेमेंट, लाइट बिल पेमेंट इत्यादी कामं होणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांशी संबंधित सुमारे अनेक सेवांची सुविधा उमंगमध्ये देण्यात आली आहे. उमंग अॅप हे स्मार्टफोन, डेस्कटॉप, टॅबलेट या सर्व माध्यमांवर डाऊनलोड करता येते.कर्मचारी या अॅपच्या माध्यमातून सेवेच्या कार्यकाळातील पीएफच्या स्वरूपात जमा झालेला पैशाची सहजरीत्या माहिती मिळवू शकतात. त्यासाठी आपल्याकडे युनिव्हर्सल अकाऊंट नंबर(UAN) आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन(EPFO)मध्ये नोंदणी केलेला एक मोबाइल नंबर असावा लागतो. जर तुमचा नंबर ईपीएफओमध्ये नोंदणीकृत असेल, तर तुम्ही सहज तुमच्या खात्यातील जमा रक्कम पाहू शकता. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा उमंग अॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावं लागणार आहे. त्यानंतर ईपीएफओ पर्याय निवडावा लागणार आहे. EPFOमध्ये नोंदणी केलेल्या ग्राहकांना पीएफ खात्याची माहिती 7738299899 नंबरवर EPFOHO UAN ENG असा मेसेज पाठवल्यानंतर मिळणार आहे. त्यांना मेसेजच्या स्वरूपातच आपल्या खात्यातील जमा रक्कम समजणार आहे. तसेच ज्यांचा नंबर ईपीएफओवर नोंदणी केलेला आहे. त्यांनी 011-22901406 या नंबरवर मिस कॉल्ड केल्यास खात्यातील जमा रक्कम मेसेजद्वारे समजणार आहे.
PFवरील व्याज लवकरच जमा होतंय; SMS, मिस्ड कॉल अन् अॅपद्वारे 'असा' जाणून घ्या बॅलन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 12:32 PM