ईपीएफओच्या बैठकीत व्याजदर घटविण्याचा निर्णय घेतला आहे. हा व्याजदर गेल्या दोन वर्षांपासून 8.5 टक्के होता, तो आता 8.1 टक्के करण्यात आला आहे. ११ मार्चपासून सुरु असलेल्या दोन दिवसीय बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला आहे.
पीटीआयने याबाबचे वृत्त दिले आहे. कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या पगारातील काही भाग कापून पीएफ खात्यात जमा केला जातो. तेवढीच रक्कम त्याच्या कंपनीला या खात्यात जमा करावी लागते. ईपीएफओ या निधीचे व्यवस्थापन करते आणि या रकमेवर दरवर्षी व्याज देते. आर्थिक वर्ष 1977-78 मध्ये, EPFO ने लोकांना PF ठेवीवर 8% व्याज दिले. तेव्हापासून ते सातत्याने ते यापेक्षा जास्तच मिळत आहे.
कोरोना काळातही सरकारने व्याजदर कमी न करता ते 8.5 टक्के ठेवले होते. पीटीआयच्या बातमीनुसार, 2019-20 आणि 2020-21 या आर्थिक वर्षांमध्ये EPFO ने PF ठेवींवर 8.5% व्याज दिले होते. यापूर्वी ते 2018-19 मध्ये 8.65%, 2017-18 मध्ये 8.55%, 2016-17 मध्ये 8.65% आणि 2015-16 मध्ये 8.8% होते. ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाने शनिवारी झालेल्या बैठकीत पीएफचे व्याज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या या निर्णयाचा ६ कोटी लोकांना फटका बसणार आहे. व्याजदर कमी करण्याच्या शिफारशी अर्थ मंत्रालयाकडून आल्या होत्या आणि त्यांना ईपीएफओने मान्यता दिली होती, त्यानंतर व्याजदर ८.५ टक्क्यांवरून ८.१ टक्क्यांवर आले आहेत.