आजवर पेन्शनधारकांसाठी दर महिन्याला पेन्शन मिळण्यासाठी काही बँकाच ओळखल्या जात होत्या. यामुळे ठराविक तारखेला या बँकांमध्ये पेन्शन काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागायच्या. आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पीएफची पेन्शन आता काही महिन्यांनी कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेत घेता येणार आहे.
शहरातील बाब सोडली तर खेडोपाडी पीएफची पेन्शन आली की ज्येष्ठ नागरिकांना शहराची, तालुक्याची वाट धरावी लागते. यात पुन्हा बँकांचे लंच टाईम, हेच कागदपत्र आणा, तुम्हीच कशावरून, तुम्ही जिवंत असल्याचा दाखला आणा आदी अनेक झंझटींना तोंड द्यावे लागायचे. यात अनेक खेपा व्हायच्या. त्या वाचणार आहेत. पेन्शनधारक त्यांच्या जवळच्या कोणत्याही बँकेत त्यांचे खाते खोलून त्यात पेन्शन घेऊ शकणार आहेत.
रिटायरमेंटनंतरच्या ईपीएफओच्या ईपीएस पेन्शनमध्ये १ जानेवारी २०२५ पासून मोठा बदल होणार आहे. याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारला सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (CPPS) कडून कर्मचारी पेन्शन योजना (EPS) 1995 चा प्रस्ताव प्राप्त झाला होता. यात कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शनधारक पेन्शन काढू शकतो, असे प्रस्तावित करण्यात आले होते.
ही नवीन प्रणाली आल्याने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात महत्वाचा बदल होणार आहे. यामुळे EPFO च्या 78 लाख EPS पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (CPPS) ची मान्यता हा EPFO च्या आधुनिकीकरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे असे केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.