नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर ८.७५ वरून ८.९५ टक्के करण्याची शिफारस निधीच्या वित्तीय पॅनेलने केली आहे. भविष्य निर्वाह निधीच्या विश्वस्त मंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर अर्थ मंत्रालयाने अधिसूचना काढली की त्याची अंमलबजावणी होईल. केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया ठेवीवरील व्याजदर कमी करण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहेत, अशा वेळी भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर वाढविण्याची शिफारस करण्यात आली आहे. व्याजदरात वाढ झाली तर बँकांमधील ठेवी तसेच लघु बचत योजनेतील काही निधी तिकडे वळवावा लागेल, असे अर्थमंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना वाटते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, तसेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड यासारख्या बचत योजनांवरील व्याजदर ५० बेसिस पॉइंटने कमी करण्याचा केंद्राचा विचार असून त्याची लवकरच घोषणा अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर वाढविण्यासाठी अर्थमंत्रालयाकडून विरोध होण्याची शक्यता आहे. असे असले तरी मध्यमवर्ग भविष्य निर्वाह निधीवरील बचतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो, त्यामुळे या प्रस्तावाला विरोध झाला तरी तो टिकणार नाही.
भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर ८.९५ टक्के?
By admin | Published: January 23, 2016 3:42 AM