Join us

पीएफची रक्कम पसंतीनुसार शेअर बाजारात गुंतविता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:55 AM

भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे (ईपीएफओ) प्रॉव्हिडंट फंडाची (पीएफ) शेअर बाजारात गुंतविली जाणारी रक्कम पसंतीनुसार कमी करण्याचा किंवा वाढविण्याचा पर्याय, ५ कोटींहून अधिक नोकरदारांना याच वित्तीय वर्षात उपलब्ध होणार आहे.

नवी दिल्ली: भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे (ईपीएफओ) प्रॉव्हिडंट फंडाची (पीएफ) शेअर बाजारात गुंतविली जाणारी रक्कम पसंतीनुसार कमी करण्याचा किंवा वाढविण्याचा पर्याय, ५ कोटींहून अधिक नोकरदारांना याच वित्तीय वर्षात उपलब्ध होणार आहे. ‘ईपीएफओ’ सदस्यांच्या ‘पीएफ’पोटी जमा होणाऱ्या रकमेचा काही भाग ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंडा’च्या (ईटीएफ) स्वरूपात शेअर बाजारात गुंतवते.आतापर्यंत ‘ईटीएफ’मधील गुंतवणुकीची नोंद प्रत्येकाच्या ‘पीएफ’ खात्यात करण्याचे काम तीन महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर, सदस्यांना गुंतवणूक वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा पर्याय उपलब्ध होईल.‘ईपीएफओ’चे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी सांगितले की, ‘ईटीएफ’मधील गुंतवणूक प्रत्येकाच्या खात्यात स्वतंत्रपणे दाखविण्यासाठी आम्ही सॉफ्टवेअर विकसित करत आहोत. सदस्यांना पसंतीनुसार शेअर बाजारात गुंतवणुकीचा पर्याय देण्याची व्यवहार्यता तपासण्याचे केंद्रीय विश्वस्त मंडळ (सीबीटी) या ‘ईपीएफओ’च्या सर्वाच्च धोरणविषयक संस्थेने गेल्या बैठकीत ठरविले होते. त्यानुसार, आता पावले टाकली जात आहेत. सदस्याच्या खात्यात ‘ईटीएफ’ गुंतवणूक व त्याखेरीजची इतर जमा रक्कम स्वतंत्रपणे दाखविण्याची सुधारित लेखापद्धती स्वीकारण्याचा निर्णय आधीच झाला आहे.‘ईटीएफ’चा परतावा १७ टक्के‘ईपीएफओ’ने ‘ईटीएफ’द्वारे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास आॅगस्ट २०१५ पासून सुरुवात केली. ५ टक्क्यांपासून सुरुवात करून, टप्प्याटप्प्याने ती १५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली.फेब्रुवारी २०१८च्या अखेरपर्यंत ‘ईपीएफओ’ने ४१,९६७.५१ कोटी रुपये ‘ईटीएफ’ मध्ये गुंतविले. त्यावर सरासरी १७.२३ टक्के परतावा मिळाला. या मार्चमध्ये ‘ईटीएफ’मधून प्रथमच २,५०० कोटी रुपये काढून घेतले होते.

टॅग्स :शेअर बाजार