नवी दिल्ली - पीएफचे पैसे काढण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) विभागाने याबाबत आज नवा नियम जाहिर केला आहे. पीएफमधून दहा लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी EPFOने ऑनलाईन अर्ज अनिवार्य केला आहे. EPFO ने पेपरलेस वर्क करण्याकडे हे पाऊल उलचले आहे.
यासोबतच ईपीएफओने कर्मचारी पेन्शन योजना (EPS) 1995 मधून पाच लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठीही ऑनलाईन अर्ज अनिवार्य केला आहे. सध्या EPFO खातेदारांना ऑनलाईनसोबतच मॅन्युअल पद्धतीनेही पैसे काढण्याची परवानगी आहे.
दरम्यान, नोकरदार वर्गासाठी महत्वाच्या असलेल्या कर्मचारी भविष्य निधी (पीएफ)वरील व्याजदरात गेल्या आठवड्यात कपात केली आहे. 8.65 टक्के असलेला व्याजदार 2017-18 वर्षासाठी 8.55 टक्के होऊ शकतो. ईपीएफओच्या या निर्णयाचा पाच कोटी कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्याता आहे. हा नोकरदारवर्गासाठी एक धक्का आहे. गेल्या पाच वर्षातील हा सर्वात कमी व्याजदर आहे. गेल्या तीन वर्षामध्ये पीएफवरील व्याजदात सतत कपात केली जात आहे. ईपीएफओने 2016-17 मध्ये 8.65 टक्के व्याजदराची घोषणा केली होती. त्यापूर्वी 2015-16मध्ये पीएफवरील व्याजदर 8.80 टक्के होता.