Join us  

निम्म्यापेक्षा अधिक पेमेंट मोबाइलनेच; तब्बल ५७ टक्के वाढ, ‘फोनपे’ आणि ‘गुगल पे’चा सर्वाधिक वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 7:44 AM

‘यूपीआय’द्वारे झालेल्या व्यवहारांमध्ये ५७ टक्के वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटसाठी ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ला (यूपीआय) लोकांची प्रथम पसंती मिळत असून, वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये ‘यूपीआय’द्वारे झालेल्या व्यवहारांमध्ये ५७ टक्के वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. 

‘बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप’ने (बीसीजी) जारी केलेल्या ‘बँकिंग सेक्टर राउंडअप-एफवाय २४’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, डिजिटल व्यवहारांमध्ये ‘फोनपे’ आणि ‘गुगल पे’ यांची हिस्सेदारी सर्वाधिक आहे. दोन्ही कंपन्यांची मिळून डिजिटल व्यवहारांची हिस्सेदारी ८६ टक्के राहिली. लोकांनी जवळ रोकड बाळगणे कमी केले असून  यूपीआय व्यवहारांवर त्यांचा विश्वास अधिक वाढल्याचे यातून दिसून येत आहे. 

अहवालात म्हटले आहे की, मागील ३ वर्षांत क्रेडिट कार्डांवरील व्यवहार दुपटीने वाढले आहे. मात्र, वित्त २०२३-२४ मध्ये वार्षिक आधारावर त्यात ४३ टक्के घसरण झाली आहे. वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये कर्जवृद्धी (क्रेडिट ग्रोथ) १५ टक्के, तर जमावृद्धी (डेबिट ग्रोथ) १३ टक्के वाढली आहे.

बँकांना ३ लाख कोटींहून अधिक नफा 

- वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये बँकिंग क्षेत्राचा शुद्ध नफा प्रथमच ३ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिल्याचे दिसून आले आहे. सर्व बँकांच्या ‘मालमत्तांवरील परताव्या’त (रिटर्न ऑन ॲसेट) १ टक्क्यापेक्षा अधिक तेजी आली. 

- खासगी बँकांचा नफा वार्षिक आधारावर २५ टक्के वाढला, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा शुद्ध नफा ३४ टक्के वाढल्याचे बीसीजीच्या अहवालात म्हटल आहे.

- बँकांच्या अनुत्पादक मालमत्तांचे (एनपीए) प्रमाण घसरून २.८ टक्के झाले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एनपीए ३.५ टक्के, तर खासगी क्षेत्रातील बँकांचा एनपीए १.७ टक्के झाला आहे.

 

टॅग्स :गुगल पे