Join us

फोनचा रिचार्ज महागला! जिओपाठोपाठ एअरटेलने केली मोबाइल सेवांच्या दरांत मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 5:20 AM

एअरटेलचे नवीन दर ३ जुलैपासून लागू होतील.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : रिलायन्स जिओपाठोपाठ आता भारती एअरटेलनेही आपल्या विविध मोबाइल सेवांच्या दरांत १० ते २१ टक्के वाढ केली आहे. रिलायन्स जिओने गुरुवारी मोबाइल सेवांच्या दरांत वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शुक्रवारी एअरटेलने दरवाढ जाहीर केली आहे. अडीच वर्षांत दूरसंचार सेवांच्या दरांत प्रथमच वाढ होत आहे. एअरटेलचे नवीन दर ३ जुलैपासून लागू होतील.

रिचार्ज महाग का केला? एअरटेलने म्हटले की, दूरसंचार क्षेत्रास किफायतशीर व्यवसाय मॉडेल बनविण्यासाठी प्रतिवापरकर्ता महसूल (एआरपीयू) ३०० रुपयांपेक्षा अधिक असायला हवा. एआरपीयूचा हा दर नेटवर्क तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रमच्या गुंतवणुकीसाठी कंपन्यांना सक्षम करील. त्यातून गुंतवणुकीवर सामान्य परतावा मिळेल. जिओने एक दिवस आधीच दरवाढ जाहीर केली आहे. कंपनीने आपले प्रीपेड व पोस्टपेड प्लॅन १५ ते २५ टक्क्यांनी महाग केले आहेत. 

व्होडाफोन आयडियाही करणार दरवाढ? व्होडाफोन आयडियाकडूनही दरवाढीची शक्यता आहे. कंपनीकडून लवकरच दरवाढीची घोषणा केली जाऊ शकते. दरवाढीनंतर एअरटेलचे बहुतांश मोबाइल प्लॅन जिओच्या प्लॅनपेक्षा महाग असतील.

किती महागला रिचार्ज? - अमर्याद ‘व्हॉइस प्लॅन’चा दर १७९ रुपयांवरून १९९ रुपये होईल. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनच्या दरात २० रुपयांची वाढ झाली आहे. यात वापरकर्त्यास २ जीबी डाटाही मिळतो. - सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालील भारती एअरटेलने म्हटले की, आम्ही प्रारंभिक पातळीवरील प्लॅनच्या दरांत कमीत कमी म्हणजेच प्रतिदिन ७० पैसे इतकी वाढ केली आहे.

एअरटेल प्लॅन (रुपयांत)सध्या     नवीन     वैधता१७९     १९९     २८ दिवस४५५     ५०९     ८४ दिवस२६५     २९९      २८ दिवस२९९     ३४९     २८ दिवस३५९     ४०९     २८ दिवस२९९९     ३५९९     ३६५ दिवस

जिओ प्लॅन (रुपयांत)सध्या     नवीन     वैधता१५५     १८९     २८ दिवस२०९     २४९     २८ दिवस२९९     ३४९     २८ दिवस३४९     ३९९     २८ दिवस६६६     ७९९     ८४ दिवस२९९९     ३५९९     ३६५ दिवस

टॅग्स :जिओमोबाइलएअरटेल