Join us

चलनी नोटांवर रविंद्रनाथ टॅगोर अन् कलामांचा फोटो? RBI ने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 8:17 AM

आरबीआयकडे नोटांवरील फोटो बदलण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, असे दयाल यांनी सांगितले

नवी दिल्ली - भारतीय चलनी नोटांवर आता आणखी काही महापुरुषांचे फोटो छापण्यात येणार असल्याची चर्चा सोशल मीडियातून सातत्याने पुढे येते. मात्र, देशातील चलनी नोटांवरुन महात्मा गांधींचा फोटो बदलण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. काही माध्यमांतून चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो बदलून इतर नेत्यांचा फोटो छापण्यात येणार असल्याचे वृत्त आहे, पण हे वृत्त निराधार असल्याचे आरबीआयचे मुख्य व्यवस्थापक योगेश दयाल यांनी स्पष्ट केले.

आरबीआयकडे नोटांवरील फोटो बदलण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, असे दयाल यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, अर्थ मंत्रालय आणि आरबीआयद्वारे काही ठराविक मुल्यांच्या चलनी नोटांवर गुरुदेव रविंद्रनाथ टॅगोर आणि माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांचा फोटो छापण्यात येईल असे प्रस्तावित असल्याचे म्हटले होते. काही बँकांकडून नोटांवर रविंद्रनाथ टॅगोल आणि अब्दुल कलाम यांच्या फोटोंचा वॉटरमार्क लावण्याचा विचार सुरू असल्याचेही मीडियात वृत्त होते.   

आरबीआय आणि सिक्योरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया (SPMCIL) ने आयआयटी-दिल्लीच्या एमेरिटस प्रोफेसर दिलीप टी साहनी यांना गांधी, टॅगोर आणि कलाम यांच्या छायाचित्रांच्या वॉटरमार्कचे दोन वेगवेगळे सेट पाठवले होते, असेही वृत्त मीडियात होते. मात्र, आरबीआयने हे वृत्त निराधार असल्याचे सांगत, तसा कुठलाही प्रस्ताव नसल्याचेही स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, रविंद्रनाथ टॅगोर यांचे नाव देश आणि जगभरात आदराने घेतले जाते. मात्र, पश्चिम बंगालमध्ये त्यांना विशेष दर्जा देण्यात आला आहे. बंगालमधील बहुतांश घरात रविंद्रनाथ टॅगोर यांचा फोटो पाहायला मिळतो. तर, देशाचे 11 वे राष्ट्रपती राहिलेल्या एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल देशवासीयांच्या मनात श्रद्धास्थान आहे. भारताला महासत्ता बनविण्याचं स्वप्न त्यांनीच आपल्याला दाखवलं होतं.  

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकरुपी बँकमहात्मा गांधीएपीजे अब्दुल कलाम