Join us

PhysicsWallahचा IPO येणार! कंपनीनं सुरू केलं काम; ४ इन्व्हेस्टमेंट बँकर्सचीही केली नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 9:57 AM

PhysicsWallah IPO: एडटेक स्टार्टअप फिजिक्सवाला देखील आता आपला आयपीओ (IPO) लाँच करण्याच्या तयारीत आहे. पाहा काय आहे कंपनीचा प्लॅन.

PhysicsWallah IPO: एडटेक स्टार्टअप फिजिक्सवाला देखील आता आपला आयपीओ (IPO) लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने ४ इन्व्हेस्टमेंट बँकर्सची सल्लागार म्हणून नेमणूकही केली आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या चार सूत्रांनी ही माहिती दिली आहे. कंपनी पुढील वर्षी २०२५ मध्ये आपला आयपीओ आणण्याची योजना आखत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. महिनाभरापूर्वीच फिजिक्सवालाने फंडिंग राऊंड पूर्ण केली. या फंडिंगमध्ये कंपनीचं मूल्यांकन २.८ अब्ज डॉलर्स (सुमारे २८,५०० कोटी रुपये) असा अंदाज होता.

कंपनीने अॅक्सिस कॅपिटल, कोटक महिंद्रा कॅपिटल, गोल्डमन सॅक्स आणि जेपी मॉर्गन यांना सल्लागार म्हणून नियुक्त केलं आहे. कंपनीनं नुकतीच त्यांच्यासोबत बैठक घेतली. मनी कंट्रोलनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. दरम्यान, दुसऱ्या व्यक्तीनंही या माहितीला दुजोरा दिला. मात्र, गरज पडल्यास कंपनी आणखी काही इन्व्हेस्टमेंट बँकर्सची नेमणूक करू शकते, असंही ते म्हणाले.

"प्रस्तावित इश्यूमुळे ४० कोटी डॉलर्स ते ५० कोटी डॉलर्स इतकी रक्कम जमा केली जाऊ शकते. मात्र, आयपीओच्या रकमेबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही आणि नंतर डीलची साईज बदलू शकते," असं तिसऱ्या व्यक्तीनं सांगितलं.

आयपीओमध्ये नवीन आणि जुने दोन्ही शेअर्स विकले जाऊ शकतात. नवीन शेअर्सच्या विक्रीतून मिळणारी रक्कम कंपनी आपल्या वाढीसाठी वापरणार आहे. त्याचबरोबर ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदारांना कंपनीतून बाहेर पडण्याची किंवा आपला हिस्सा कमी करण्याची संधी दिली जाऊ शकते, असं आणखी एका सूत्रानं म्हटलं.

किती असेल मूल्यांकन?

दरम्यान, कंपनी ४ ते ५ अब्ज डॉलरच्या मूल्यांकनावर आपला आयपीओ आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा सध्या व्यवसाय क्षेत्रात सुरू आहे. मात्र, त्याची स्वतंत्रपणे पडताळणी होऊ शकली नाही. फिजिक्सवालामध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये वेस्टब्रिज कॅपिटल, जीएसव्ही वेंचर्स, लाइटस्पीड व्हेंचर पार्टनर्स आणि हॉर्नबिल कॅपिटल यांचा समावेश आहे.    

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार