देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून विविध प्रकारच्या योजना चालवल्या जातात. यांपैकी अनेक योजना अशाही आहेत, ज्यांत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. याच प्रकारचा एक मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये सरकारने तुमच्या बँक खात्यात 2.67 लाख रुपये ट्रान्सफर केल्याचा दावा करण्यात आला आहे. जर आपल्यालाही असा काही मेसेज आला असेल तर सावधान. यासंदर्भात स्वतः सरकारनेच एक ट्विट करत माहिती दिली आहे.
काय आहे मेसेजमध्ये - लोकांच्या मोबाईलवर येणाऱ्या मेसेजमध्ये दावा करण्यात येत आहे, की हे पैसै सरकारच्या योजनेंतर्गत आपल्या खात्यात ट्रांसफर केले जात आहेत. तसेच, या मेसेजच्या शेवटी आपल्याला एका लिंकवर क्लिक करण्यासही सांगण्यात आले आहे.
बनावट मेसेजपासून सावध राहणे आवश्यक -यासंदर्भात पीआयबीने आपल्या अधिकृत अकाउंटवर फॅक्ट चेकच्या माध्यमाने यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच ट्विटमध्ये, आपल्याकडून अशी कुठल्याही प्रकारची योजना चालविली जात नाहीय, असे स्पष्ट केले आहे. याच बरोबर, पीआयबीने, अशा बनावट मेसेजपासून सावध राहण्याचा, तसेच अनोळखी लिंक अथवा मेसेजवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे.
आपणही करू शकता फॅक्ट चेक -आपल्याकडे अशा पद्धतीचा मेसेज आल्यास, आपणही पीआयबी (PIB) कडून फॅक्ट चेक करून घेऊ शकता. यासाठी आपल्याला https://factcheck.pib.gov.in/ वर व्हिझिट करावी लागेल. याशिवाय, आपण व्हाट्सअॅप क्रमांक +918799711259 वर अथवा ईमेलः pibfactcheck@gmail.com वरही माहिती पाठवू शकता.