नवी दिल्ली - इंडियन बँकेपाठोपाठ आता सर्वच बँकांच्याएटीएममधून दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा बंद होणार आहे. त्याऐवजी 100 रुपये ते 500 रुपये मूल्याच्या नोटा एटीएममध्ये मिळतील. त्यामुळे ग्राहकांना मोठाच दिलासा मिळणार आहे. तर, दोन हजारांच्या नोटा व्यवहारात कमी झाल्याने, आता 1 हजार रुपयाची नवी नोट बाजारात येणार असल्याची चर्चा होत्या. विशेष म्हणजे सोशल मीडियावर एक नोट व्हायरल होत असून ती सरकारने जारी केलेली नवीन नोट असल्याचे सांगितले जाते.
सोशल मीडियावरील व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 1 हजार रुपयांची नवी नोट जारी करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच, या नोटेचा फोटो व्हायरल होत आहे. मात्र, ही अफवा असल्याचं आता स्पष्ट झालंय. कारण, स्वत: सरकारच्या ट्विटर हँडलवरुन याबाबत खुलासा करण्यात आला आहे.
सरकारची धोरणं आणि योजनांबद्दल खात्रीशीर माहिती देणाऱ्या आणि फेक माहितीची खातरजमा करणाऱ्या प्रेस इन्फॉरमेशन ब्युरोच्या ट्विटवर हँडलवरुन याबाबत खुलासा करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेकडून 1 हजार रुपयांची अशी कुठलिही नोट जारी करण्यात आली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो फेक असल्याचं पीआयबीने म्हटलं आहे.