Lokmat Money > बिझनेस न्यूज > नऊ जिल्ह्यांना मिळणार पाइपने स्वयंपाकाचा गॅस

नऊ जिल्ह्यांना मिळणार पाइपने स्वयंपाकाचा गॅस

२०.५८ लाख कुटुंबांना लाभ; ३८१ सीएनजी स्थानकांचीही उभारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 12:31 AM2018-09-19T00:31:54+5:302018-09-19T00:32:23+5:30

२०.५८ लाख कुटुंबांना लाभ; ३८१ सीएनजी स्थानकांचीही उभारणी

Pipes to get gas from nine districts, cooking gas | नऊ जिल्ह्यांना मिळणार पाइपने स्वयंपाकाचा गॅस

नऊ जिल्ह्यांना मिळणार पाइपने स्वयंपाकाचा गॅस

- चिन्मय काळे

मुंबई : राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील २०.५८ लाख कुटुंबांना पाइपने स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा होणार आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियमन मंडळाने (पीएनजीआरबी) त्यासाठी तीन कंपन्यांची निवड केली आहे. यामुळे या कुटुंबांना एलपीजी सिलिंडरची गरज भासणार नाही. या योजनेत राज्यातील अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.
देशभरातील ८४ जिल्ह्यांमधील कुटुंबांना स्वयंपाकासाठी पाइपने नैसर्गिक वायूचा पुरवठा करणे व त्या जिल्ह्यांमध्ये सीएनजी स्थानके उभी करण्यासाठी पीएनजीआरबीने जुलैमध्ये निविदा काढल्या होत्या. त्याद्वारे कंत्राट जिंकलेल्या कंपन्यांची यादी मंडळाने जाहीर केली आहे.
कंत्राट मिळालेल्या तिन्ही कंपन्यांना नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी या जिल्ह्यांमध्ये ७१७१ किलोमीटर इतक्या लांबीची पाइपलाइन टाकायची आहे. त्याखेरीज ३८१ सीएनजी स्थानकेही उभी करायची आहेत. भविष्यात बहुतांश वाहने सीएनआजी इंधनावर आधारित असावी, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यावेळी वाहनात सीएनजी भरण्यासाठी या स्थानकांचा उपयोग होईल. भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेडला अहमदनगर व औरंगाबाद आणि सातारा व सांगली या जिल्ह्यांसाठी संयुक्त कंत्राट मिळाले आहे. महाराष्टÑ नॅचरल गॅस लिमिटेडला धुळे व नाशिक जिल्ह्याला पुरवठा करण्याचे संयुक्त कंत्राटासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरवठ्याचेही कंत्राट मिळाले आहे. युनिसन एन्वायरो प्रायव्हेट लिमिटेडला लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या गॅस पुरवठ्याचे कंत्राट मिळाले आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियमन मंडळाच्या या योजनेत देशभरात ४,३४६ सीएनजी स्थानके उभी होणार असून २.१० कोटी घरांना पाइपने गॅसचा पुरवठा होणार आहे. पीएनजीआरबीने सध्या फक्त कंत्राट जाहीर केले आहे. कामाचे स्वरूप, कालावधी हे त्या-त्या जिल्ह्यानुसार कंपन्यांना देण्यात येणाऱ्या आदेशात नमूद असेल.

अशी असेल योजना
जिल्हा                               सीएनजी स्थानके           घरगुती जोडण्या
अहमदनगर-औरंगाबाद             १०६                          ७,०८,१००
धुळे-नाशिक                              १५६                         ९,३७,९६५
लातूर-उस्मानाबाद                        ३०                               ९,९९९
सांगली-सातारा                             ६४                        ३,७६,७००
सिंधुदुर्ग                                       २५                            २५,७७९
एकूण                                        ३८१                       २०,५८,५४३

Web Title: Pipes to get gas from nine districts, cooking gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.