दिवाळखोरीत गेलेली दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) ही कंपनी पीरामल एन्टरप्राईजेसने ३८,०५० कोटी रुपयांना विकत घेतली आहे. इन्सॉल्व्हन्सी अँड बँककरप्सी बोर्ड ऑफ इंडिया (आयबीसी)च्या माध्यमातून देशातील वित्तीय क्षेत्रात आजवरचा झालेला हा सर्वात मोठा खरेदी व्यवहार आहे, असे पीरामल एन्टरप्राईजेसने म्हटले आहे.
या व्यवहारानुसार, पीरामल ३४,२५० कोटी रुपये रोख तसेच अपरिवर्तनीय रोख्यांच्या स्वरूपात आयबीसीला देणार आहे व उर्वरित रक्कम ही कर्ज फेडताना दिली जाईल. डीएचएफएलला कर्जे देणाऱ्या बँकांपैकी ९४ टक्के बँकांनी ही कंपनी पीरामल एन्टरप्राईजेसला विकली जावी, असे मत व्यक्त केले होते. या व्यवहाराला रिझर्व्ह बँक, भारतीय प्रतिस्पर्धा आयोग, भारतीय कंपनी कायदा लवादानेही मंजुरी दिली होती. डीएचएफएल विकत घेण्यासाठी पीसीएचएफएल व अडानी यांच्यासह चार कंपन्यांनी बोली लावली होती.
आता या खरेदी व्यवहारानंतर पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स (पीसीएचएफएल) व डीएचएफएल या कंपन्यांचे विलिनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पीसीएचएफएल ही देशातील प्रमुख वित्तीय कंपनी बनणार आहे, असे पीरामल एन्टरप्राईजेसने सांगितले.
घोटाळ्यांचे आरोप
डीएचएफएल ही दिवाळखोरीत गेलेली कंपनी म्हणून जाहीर करण्यात आले होते. डीएचएफएलने पंजाब नॅशनल बँकेत ३६८८.५८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. येस बँकेमध्ये केलेल्या घोटाळ्याप्रकरणी डीएचएफएलची चौकशी करण्यात आली.