Join us

सूनबाई भारी भाग्याची... अंबानींशी नातं जुळताच पिरामल समूहाला 'अच्छे दिन'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 11:24 AM

ईशा आणि आनंद यांच्या लग्नाच्या बातमीमुळे सोमवारी शेअर बाजारात पिरामल कुटुंबाची चांदी झाली.

मुंबई: परीसस्पर्श झाल्यावर जो चमत्कार होतो, तशीच काहीशी किमया पिरामल उद्योगसमूहाच्या बाबतीतही घडली आहे. देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबाशी - अर्थात 'द अंबानीं'शी त्यांचं नातं जुळल्याची बातमी जगभरात पसरल्यानंतर पिरामल उद्योगसमूहाचे शेअर्स उसळलेत. त्यांचं बाजारमूल्य तब्बल ८०० कोटी रुपयांनी वाढलं आहे. 

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या लाडक्या लेकीची - ईशाची लगीनगाठ आनंद पिरामल या तरुण-तडफदार उद्योगपतीशी बांधली जाणार आहे. आनंद यांचे वडील, अर्थात पिरामल ग्रूपचे संचालक अजय पिरामल हेही लक्ष्मीवंतच. देशातील कुबेरांच्या यादीत ते २२व्या क्रमांकावर आहेत. अजय पिरामल यांची एकूण उलाढाल ३३ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. जगातील ३० देशांमधील १०० हून अधिक शहरात त्यांच्या उद्योगाचा विस्तार आहे. 

असं असतानाच, ईशा आणि आनंद यांच्या लग्नाच्या बातमीमुळे सोमवारी शेअर बाजारात पिरामल कुटुंबाची चांदी झाली. पिरामल इंटरप्रायजेसचे शेअर सुमारे २.३९ टक्क्यांनी वधारले. त्यामुळे त्यांचं सध्याचं बाजारमूल्य ४४,९६१.५७ कोटी रुपये इतकं आहे. म्हणजे, पिरामल कुटुंबाची भावी सून ईशा त्यांच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनीच जातेय, असं म्हणायला हरकत नाही. 

मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीचा साखरपुडा मार्च महिन्यात श्लोका मेहताशी झाला होता. त्यानंतर रविवारी पुन्हा अँटिलियावरून शुभमंगलवार्ता आली. ईशा अंबानी डिसेंबर महिन्यात आनंद पिरामल याच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. या लग्नामुळे अंबानी आणि पिरामल यांच्यातील चार दशकांच्या मैत्रीचं नात्यात रूपांतर होणार आहे. महाबळेश्वर येथील एका मंदिरात आनंदने ईशाला लग्नाची मागणी घातली होती. ईशाने त्याला होकार दिल्यानंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी सहभोजन करून आनंद साजरा केला होता. त्यानंतर सोमवारी अँटिलियावर या दोघांचा साखरपुडाही झाला. या शुभवार्तेनं शेअर बाजारातही 'आनंद' पसरला आहे. 

टॅग्स :ईशा अंबानीमुकेश अंबानीरिलायन्स