Join us

GST Hike: हॉलिडेवर जाण्याचा प्लॅन करताय? महागात पडणार, दोन रात्रीसाठी बक्कळ पैसे मोजावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 1:48 PM

GST Hike: १८ जुलैपासून हॉटेलच्या खोल्यांवर जीएसटी लागणार आहे. आतापर्यंत १००० रुपयांपेक्षा कमी भाडे असलेल्या हॉटेलमधील रुमवर जीएसटी लागत नव्हता.

महागाईच्या काळात सरकारी तिजोरी भरून आता ओसंडून वाहत आहे. दर महिन्याला गेल्या महिन्यातील रेकॉर्ड मोडले जात आहेत. असे असताना केंद्र सरकारने येत्या १८ जुलैपासून अन्य अनेक गोष्टींवर जीएसटी वाढविला आहे. यामध्ये आता १००० रुपयांपर्यंतचे हॉटेलचे रुमही येत आहेत. यामुळे सुट्टीवर फिरायला जाण्याचा बेत असेल तर तो महागात पडणारा आहे. 

१८ जुलैपासून हॉटेलच्या खोल्यांवर जीएसटी लागणार आहे. आतापर्यंत १००० रुपयांपेक्षा कमी भाडे असलेल्या हॉटेलमधील रुमवर जीएसटी लागत नव्हता. परंतू, जीएसटी काऊंसिलने २९ जूनला एक पत्रक जारी करून जीएसटी लावला जाणार असल्याचे म्हटले होते. 

आतापर्यंत सरकारकडून १००० रुपयांपेक्षा कमी खोल्यांवर जीएसटी लावण्याचे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, जीएसटी काऊंसिलने यावर १२ टक्के जीएसटी लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. १८ जुलैपासून ७५०० रुपयांपर्यंत भाडे असलेल्या रुमवर १२ टक्के जीएसटी लागणार आहे. त्यावरील भाड्याच्या रुमवर १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. जीएसटी आकारल्यामुळे बाहेर सुट्टी एन्जॉय करण्यास जाणाऱ्या व १००० रुपयांपेक्षा कमी भाड्याच्या खोल्या घेणाऱ्या लोकांना महाग पडणार आहे. मोदी सरकार कराची व्याप्ती वाढविण्याचा विचार करत आहे, परंतू यामुळे सामान्यांवरील कराचे ओझे वाढणार आहे. 

जर दोन दिवसांसाठी ९०० रुपयांची रुम बुक केली तर आतापर्यंत १८०० रुपयेच द्यावे लागत होते. परंतू जीएसटी लागल्यावर २१६ रुपये जादाचे द्यावे लागणार आहेत. यामुळे आता १८०० रुपयांऐवजी २०१६ रुपये द्यावे लागणार आहेत.  

टॅग्स :जीएसटी