मुंबई : शेतकऱ्यांना आता समुद्रातील वनस्पतींपासून तयार झालेली खते वापरता येणार आहेत. यासंबंधी कॅनडाच्या ‘अॅकॅडीअन सीप्लान्ट’ या कंपनीने भारतात कारखाना उभा केला आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीला हातभार लागणार आहे.उत्तर अटलांटिक समुद्रात विशिष्ट प्रकारची वनस्पती समुद्राच्या गर्भात तयार होऊन त्यानंतर पृष्ठभागावर तरंगत येते. या वनस्पतींमध्ये मुबलक पोषणमूल्ये असतात. त्याचा उपयोग शेतीसाठी करण्यासाठी लुईस आणि जीन-पॉल देव्यू यांनी ३७ वर्षांपूर्वी संशोधन सुरू केले. त्याद्वारे त्यांनी या वनस्पतींपासून खते तयार केली. आज जगातील ४० देशांमध्ये या खतांचा सेंद्रिय शेतीसाठी वापर केला जातो. ही खते आता भारतातही आली आहेत.याबाबत अॅकॅडीअन सीप्लान्ट इंडियाचे संचालक सुमेंधू घोष यांंनी ‘लोकमत’ला सांगितले की, ही वनस्पती फक्त उत्तर अटलांटिक समुद्रातच सापडते. हिवाळ्यात ही वनस्पती तयार होते व बर्फ वितळू लागले की समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगत येते. त्यावर नैसर्गिक प्रक्रियेद्वारे खतांची निर्मिती करता येते. अशी खते आता भारतीय शेतकºयांना दिली जाणार आहेत. सुरुवातीला येथे केवळ तयार खतांचे पॅकिंग केले जाईल. पण त्यानंतर खतांची निर्मितीही इथेच केली जाईल.
समुद्री वनस्पतींची खते, कॅनडीअन कंपनीची भारतात गुंतवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 5:04 AM