- संजय खांडेकर अकोला : महात्मा गांधी जयंतीपासून सिंगल युज प्लास्टिकवर केंद्र सरकारकडून बंदी येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे अकोल्यातील २३ मोठ्या हॉटेल व्यावसायिक संचालकांनी पर्यायी व्यवस्था शोधण्याची तयारी सुरू केली आहे. हॉटेल व्यावसायिकांकडून सरकारच्या धोरणावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी स्वागत केले, तर काहींनी जहाल टीका नोंदविली आहे. दरम्यान, सरकारच्या धोरणामुळे अकोल्यातील हॉटेल व्यावसायिकांना कोट्यवधींचा फटका सोसावा लागणार आहे.सिंगल युज प्लास्टिकवर बंदी आणण्याचे प्रयोग केंद्राकडून सुरू आहेत. त्यानिमित्ताने सर्वात मोठा फटका देशभरातील हॉटेल व्यावसायिकांना सोसावा लागणार आहे. अकोल्यातील हॉटेल व्यावसायिकांची यासंदर्भात चर्चा सुरू झाली असून, अनेकांनी पर्यायी व्यवस्था सुरू केली आहे. अकोल्यात तीन स्टार असलेल्या बोटांवर मोजण्याएवढे हॉटेल्स आहेत. मोठ्या हॉटेल्सची संख्या येथे २३ असून, लहान हॉटेल्सची गणना केली तर त्यांची संख्या १२० च्या घरात जाते. सिंगल युज प्लास्टिक बंदीचा सरासरी फटका प्रत्येकी दहा हजार जरी पकडला तरी एका दिवसात लाखो रुपयांचे नुकसान समोर येते.ही आकडेवारी कोट्यवधींच्या घरात जाते. २ ऑक्टोबरच्या महात्मा गांधी जयंतीपासून सिंगल युज प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन केले जात आहे. कॉर्पोरेट शहरापासून तर अकोल्यासारख्या जिल्ह्यापर्यंत त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. पर्यायी वस्तू म्हणून काय वापरता येईल, याचा शोध आता हॉटेल व्यावसायिकांकडून सुरू झाला आहे. मोठ्या शहरातील हॉटेल व्यावसायिकांकडून विचारणा आणि सल्ले घेतले जात आहेत.>काचेचे ग्लास आणि स्टीलचे जार पुन्हा वापरातसिंगल युज प्लास्टिकमध्ये सर्वात जास्त पाण्याच्या बाटल्यांचा वापर होतो. अलीकडे हॉटेल्समध्ये आरो प्लांट असले तरी ग्राहकास सिलपॅक मिनरल वॉटर दिले जाते. यावर मोठी उलाढाल होते; मात्र ही बंदी आली तर हॉटेल व्यवसायात पुन्हा काचेचे ग्लास आणि स्टीलचे जार येतील.>पार्सलवर परिणामपार्सल देणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. कारण आता ओल्या भाज्यांचे पार्सल देताना भांडी ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे मंदीत हा खर्च अधिक वाढणार आहे. प्लास्टिकच्या बॉटल बंदीनंतर काचेची किंवा धोका नसलेली बॉटल सोबत ठेवावी लागणार आहे.>सिंगल यूज प्लॉस्टिकवरील बंदीबाबत १३० कोटी जनतेतून सूचना आणि तक्रारी मागवायला हव्यात. त्याशिवाय बंदीचा एकतर्फी निर्णय घेऊ नये. या बंदीनंतर फॅक्टऱ्यांना लागणारे कुलूप, बेरोजगारी, पर्यायी व्यवस्था याचा सारासार विचारही सरकारने केला पाहिजे.- जसपालसिंग नागरा-----------------सरकारने चालविलेला प्लास्टिकबंदीचा निर्णय स्वागतार्ह आहे. प्लास्टिक बॉटलवर बंदी आल्यानंतर आपोआप पर्याय उपलब्ध होतील. स्टीलच्या आणि काचेच्या भांड्यांचा वापर सुरू होईल. पर्यावर रक्षणाच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे आहे. आम्ही त्या दिशेने पर्यायी व्यवस्था सुरू केली आहे.- अनिल मूलचंदानी------------------सिंगल यूज प्लास्टिकच्या बंदीसोबच शासनाने विविध पॅकिंगकडे लक्ष वेधले पाहिजे. सिंगल युज प्लास्टिकचा फटका सर्वात जास्त हॉटेल व्यावसायिकांना बसणार आहे. देशात आधीच मंदी आहे, त्यात नको असलेले निर्णय घेऊन व्यापार संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे आत्महत्या वाढतील.- दीपक गोयनका------------------>वारंवार प्लास्टिकला पर्याय म्हणून सर्वात आधी कागद दिसतो. प्लास्टिक बंदीनंतर मोठ्या प्रमाणात कागदाचा वापर सुरू होईल. आधीच कागदाचा तुटवडा होत आहे. लाकडांच्या लगद्यापासून कागदाची निर्मिती पुन्हा वाढेल. पर्यायाने वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे पर्यावरण संतुलनाचा मुख्य उद्देश सफल होणार नाही. सरकारने या दिशेनेदेखील विचार करावा.- योगेश अग्रवाल, अध्यक्ष, अकोला हॉटेल असोसिएशन.
प्लास्टिक बंदीचा हॉटेल व्यावसायिकांना फटका; २३ हॉटेल संचालक लागले पर्यायाच्या शोधात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 11:14 AM