Join us

ब्रिटनच्या चलनात आल्या प्लॅस्टिक नोटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2016 5:46 AM

गेल्या दोन शतकांहून अधिक काळ कागद व कापड यांच्या मिश्रणापासून तयार केलेल्या चलनी नोटा वापरणाऱ्या ब्रिटनमध्ये मंगळवारपासून पहिली प्लॅस्टिकची नोट चलनात आली.

लंडन : गेल्या दोन शतकांहून अधिक काळ कागद व कापड यांच्या मिश्रणापासून तयार केलेल्या चलनी नोटा वापरणाऱ्या ब्रिटनमध्ये मंगळवारपासून पहिली प्लॅस्टिकची नोट चलनात आली.ब्रिटनमध्ये सध्या ५, १०, २० व ५० पौंडाच्या नोटा चलनात आहेत. ५ पौंड मूल्याच्या नोटा सर्वप्रथम पॉलिमरवर छापण्यात आल्या. १० आणि २० पौंडाच्या प्लॅस्टिकच्या नोटा अनुक्रमे सन २०१७ व २०२० मध्ये चलनात आणल्या जातील. मात्र, ५० पौंडाच्या प्लॅस्टिकच्या नोटा काढण्याचा सध्या तरी विचार नाही, असे बँक आॅफ इंग्लंडने स्पष्ट केले आहे. ५ पौंडाच्या प्लॅस्टिक नोटेवर एका बाजूला दुसरे महायुद्ध जिंकणारे ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे, तर दुसऱ्या बाजूला महाराणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र आहे. चर्चिल यांच्या चित्राच्या खाली त्यांनी पंतप्रधान या नात्याने १३ मे १९४० रोजी हाउस आॅफ कॉमन्समध्ये केलेल्या पहिल्या भाषणातील ‘मी तुम्हाला रक्त, कष्ट, अश्रू आणि घामाशिवाय दुसरे काही देऊ शकत नाही’ हे गाजलेले वचन छापलेले आहे.