नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना लवकरच खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय आणि पेन्शनची रक्कम वाढविण्यावर सरकार विचार करत आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीकडून असा प्रस्तावही (Universal Pension System) पाठविण्यात आला आहे. यात, देशात लोकांचे काम करण्याचे वय वाढविण्यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. तसेच, देशातील निवृत्तीवय (Retirement) वाढविण्या बरोबरच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टिमदेखील सुरू करायला हवी, असेही या समितीने म्हटले आहे.
ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता -
समितीच्या अहवालानुसार, या सूचनेप्रमाणे कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 2000 रुपये एवढी पेन्शन द्यायला हवी. महत्वाचे म्हणजे, या आर्थिक सल्लागार समितीने देशातील जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चांगली व्यवस्था करण्याची शिफारस केली आहे.
...अशा धोरणांवर सरकारांनी काम करावे -
या अहवालात 50 वर्षांवरील लोकांसाठीच्या स्किल डेव्हलपमेंट संदर्भातही भाष्य करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी, अशा धोरणांवर काम करायला हवे, ज्या माध्यमाने कौशल्य विकास होऊ शकेल. या प्रयत्नांत असंघटित क्षेत्र, दुर्गम भागात राहणारे, निर्वासित, तसेच स्थलांतरितांनाही यात सामील करून घ्यायला हवे. त्यांचेही प्रशिक्षित होणे आवश्यक आहे, असेही या अहवालात म्हणण्यात आले आहे.