Join us  

PM Kisan च्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज मोदी सरकार घेणार मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 11:55 AM

रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्यास सरकारकडून लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 17 ऑक्टोबर रोजी पुसा येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत (ICAR) आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता ट्रान्सफर केला जाईल. मात्र याआधी शेतकऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळू शकते. रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्यास सरकारकडून लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळ आणि सीसीईएच्या (CCEA) बैठकीत रब्बी पिकांच्या एमएसपीवर निर्णय अपेक्षित आहे. सुत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, सरकार रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये 9 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. डाळींच्या किमतीत सर्वाधिक बदल होऊ शकतात. दरम्यान, या वृत्तामुळे शेतकरीही आनंदी असल्याचे दिसून येत आहे. याआधी ऑगस्टमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने किंमत समर्थन योजना (PSS) अंतर्गत तूर, उडीद आणि मसूर डाळ खरेदीची मर्यादा 40 टक्क्यांपर्यंत वाढवली होती. यापूर्वी ही मर्यादा 25 टक्के होती.

कृषी मंत्रालयाची किंमत समर्थन योजना (PSS) जेव्हा कृषी उत्पादनाची किंमत किमान आधारभूत किंमतीच्या (MSP) खाली येते तेव्हा लागू होते. जुलैमध्ये छत्तीसगडने वेगवेगळ्या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी डाळींच्या एमएसपीमध्ये बदल केला होता. शेतकऱ्यांना अधिकाधिक कडधान्य पिकांची लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी डाळींच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली.

मोदी शेतकऱ्यांनाही भेटणार!दुसरीकडे, पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी देशातील जवळपास 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केला जाण्याची शक्यता आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी-स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि किसान संमेलन 2022 दरम्यान काही शेतकऱ्यांनाही भेटतील. दरम्यान, पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता केंद्र सरकारने 31 मे रोजी शेतकऱ्यांना दिला होता.

टॅग्स :नरेंद्र मोदीप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरी