नवी दिल्ली : तांदळाच्या किरकोळ किमतीत (Rice Retail Price) वाढ होत असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकार आजपासून 'भारत राईस' (Bharat Rice) बाजारात आणणार आहे. हा अनुदानित तांदूळ 5 किलो आणि 10 किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार असून फक्त 29 रुपये प्रति किलो दराने विकला जाणार आहे.
पीटीआयच्या अहवालानुसार, एका वर्षात तांदळाच्या किरकोळ किमतीत जवळपास 15 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, स्वस्त भारत दाल आणि भारत आटा नंतर आता केंद्र सरकार मोठा दिलासा देत भारत तांदूळ विकणार आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, केंद्रीयमंत्री पीयूष गोयल आज 6 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्लीतील कर्तव्य पथावर भारत तांदूळ लाँच करणार आहेत.
भारतीय तांदूळ विक्रीच्या पहिल्या टप्प्यात, भारतीय अन्न महामंडळ (FCI) दोन सहकारी संस्थांसह, नॅशनल ऍग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NAFED) आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडियासोबत (NCCF) किरकोळ साखळी केंद्री भांडारला 5 लाख टन तांदूळ विक्रीसाठी दिले जाणार आहे. तादूंळ हे 5 आणि 10 किलोच्या पॅकिंगमध्ये ग्राहकांना विकले जातील. तसेच, त्याची किंमत 29 रुपये प्रति किलो ठेवण्यात आली आहे.
रिपोर्टनुसार, ओपन मार्केट सेल स्कीम (OMMS) द्वारे समान दराने मोठ्या प्रमाणात ग्राहकांना तांदूळ विक्री दरम्यान मिळालेल्या अल्प प्रतिसादानंतर, केंद्र सरकारने एफसीआयकडून खरेदी केलेल्या तांदळाच्या किरकोळ विक्रीचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे भारत आटा आणि भारत डाळ याला जसा चांगला प्रतिसाद मिळाला तसाच भारत तादंळ यालाही मिळेल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, नाफेड आणि एनसीसीएफमार्फत भारत आटा 27.50 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे, तर भारत डाळ 60 रुपये किलो दराने विकली जात आहे. यंदा लोकसभेच्या निवडणुका होत असून त्याआधी स्वस्त दरात तांदूळ विक्री करून वाढत्या दराचा भार कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.