Join us

भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला तर काय-काय बदलेल? खुद्द PM मोदींनी सांगिलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 6:43 PM

अशात, भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला तर काय बदल होईल? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर यावर आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे.

सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, अशी आशा आहे. सध्या अमेरिका पहिल्या, चीन दुसऱ्या, जर्मनी तिसऱ्या तर जपान चौथ्या क्रमांकावर आहे. अशात, भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला तर काय बदल होईल? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर यावर आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आणण्यात आलेल्या धन्यवाद प्रस्तावावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनल्यानंतर, विकासाच्या विस्ताराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. याचा केवळ देशच नाही, तर जागतिक पातळीवरही सकारात्मक प्रभाव पडेल. येणाऱ्या काळात नवे स्टार्टअप आणि कंपन्यांनाही जागतीक उभारी मिळेल.

मोदी म्हणाले, 'मला ठाऊक आहे की, येथे असेही काही विद्वान आहेत, ज्यांना वाटते की, भारत अपोआपच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. हे असे लोक आहेत, ज्यांनी ऑटो पायलट मोड अथवा रिमोट कंट्रोलने सरकार चालवले आहे. त्यांचा काही करण्यावर विश्वास नाही. त्यांना केवळ वाट कशी पहावी हेच माहीत आहे, मात्र आम्ही  प्रयत्नांमध्ये कसल्याही प्रकारची कसर सोडत नाही. गेल्या 10 वर्षात आम्ही जे काही केले, त्याचा वेग पुढील काळात आणखी वाढवू. त्याची व्याप्तीही वाढवू.

गरीबीविरोधात निर्णायक लढाई -पंतप्रधान म्हणाले, आगामी पाच वर्षे गरिबीविरोधात निर्णायक लढाई लढण्यासाठी आहेत. गरिबीच्या विरोधात जेव्हा गरीब उभे राहतात तेव्हा तो लढा यशस्वी होतो. यामुळे येणारी ५ वर्षे गरिबीविरुद्धच्या लढाईतील निर्णायक वर्षे असून, गरिबीविरुद्धच्या लढाईत हा देश निश्चितपणे विजयी होईल. हे मी माझ्या गेल्या १० वर्षांच्या अनुभवावरून मोठ्या विश्वासाने सांगू शकतो. येणाऱ्या काही वर्षांत देशातील प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारी बदल बघायला मिळतील. देशातील प्रत्येक वर्गाला याचा फायदा होईल.

टॅग्स :नरेंद्र मोदीअर्थव्यवस्थाभारतराज्यसभा