Join us  

PM Mudra Loan : १० नव्हे तर २० लाखांचं कर्ज देणार सरकार, पण 'ही' अट करावी लागेल पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 5:50 PM

PM Mudra Loan : या योजनेत कर्जाची मर्यादा १० लाखांहून २० लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यासाठी एक अट पूर्ण करावी लागणार आहे.

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प २३ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात पीएम मुद्रा कर्ज योजनेबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. या योजनेत कर्जाची मर्यादा १० लाखांहून २० लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यासाठी एक अट पूर्ण करावी लागणार आहे.

पीएम मुद्रा योजनेची सुरुवात २०१५ मध्ये झाली होती. जे लोक स्वतःचा व्यवसाय सुरु करु इच्छितात, त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेमुळे व्यवसाय वाढतील आणि रोजगार वाढीस हातभार लागेल, असा उद्देश होता. आता २०२४ च्या अर्थसंकल्पात या योजनेची कर्ज मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे.

२०२४ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी MSME क्षेत्रात बँकाकडून कर्ज सुविधा वाढविण्यासाठी नवीन व्यवस्था आणण्याची घोषणा केली. मुद्रा कर्ज योजनेची मर्यादा १० लाखांहून २० लाख रुपये करण्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान, या सरकारी योजनेत जर व्यवसाय सुरु केला तर कमी व्याजदरावर कर्ज पुरवठा करण्यात येतो.

'ही' अट करावी लागेल पूर्ण  पीएम मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळण्याची मर्यादा दुप्पट करण्याच्या घोषणेसोबतच, निर्मला सीतारामन यांनी असेही म्हटले होते की, या वाढीव कर्ज मर्यादेचा फायदा अशा व्यावसायिकांना मिळू शकेल. ज्यांनी यापूर्वी या योजनेतंर्गत घेतलेले कर्ज पूर्णपणे भरले असेल. म्हणजेच, ज्याची कर्जाची रक्कम व्याजासहित जमा केली असेल त्यांना दुप्पट कर्ज देण्यात येणार आहे.

हे कर्ज शिशु, तरुण आणि किशोर अशा तीन श्रेणीत उपलब्ध होते. पहिल्या श्रेणीत ५० हजार, त्यानंतर दुसऱ्या श्रेणीत ५० हजार ते ५ लाख रुपये, तिसऱ्या श्रेणीत ५ ते १० लाख रुपये कर्ज देण्यात येत होते. या कर्जाची मर्यादा आता वाढविण्यात आली आहे. आता व्यावसाय करण्यासाठी २० लाख रुपयांचे कर्ज मिळू शकेल. १८ वर्षावरील कोणत्याही भारतीय नागरिकाला या योजनेचा फायदा घेता येतो. पण त्यासाठी त्याचं क्रेडिट रेकॉर्ड चांगलं असावं लागतं. त्यानं यापूर्वी कोणत्याही बँकेचं कर्ज बुडवलेलं नसावं, अशी अट आहे.

असा करू शकता ऑनलाईन अर्ज?    1. सर्वात आधी www.mudra.org.in या अधिकृत वेबसाइटवर जा.2. होम पेजवर तुम्हाला शिशु, तरुण आणि किशोर हे तीन पर्याय मिळतील. तुमच्या गरजेनुसार कोणताही एक पर्याय निवडा.3. यानंतर संबंधित अर्ज कर्जाच्या लिंकवर क्लिक करा.4. अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.5. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.6. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडा.7. अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर, हा अर्ज तुमच्या बँकेत सबमिट करा.8. बँकेच्या मंजुरीनंतर, तुम्हाला मुद्रा कर्जाचा लाभ दिला जाईल.

टॅग्स :अर्थसंकल्प 2024बँकव्यवसाय