PM Narendra Modi in Vibrant Gujarat Global Summit 2024: भारताच्या विकासाच्या प्रवासात सामील व्हा, आमच्यासोबत या. भारताच्या कानाकोपऱ्यात गुंतवणूकदारांसाठी चांगल्या संधी आहेत. तुम्ही केवळ भारतातच गुंतवणूक करत नाही, तर तरुण निर्माते आणि ग्राहकांची नवीन पिढीही घडवत आहात. तुमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. अशा प्रकारच्या भरभराटीची तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल. तुमची स्वप्ने हा मोदींचा संकल्प आहे. तुमची स्वप्ने जितकी मोठी असतील तितका माझा संकल्प मोठा असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. गुजरात व्हायब्रंट समिटमध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते.
भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे आमचे ध्येय आहे. गेल्या १० वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा बदल झाला आहे. १० वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी होती. मात्र, आता भारताची अर्थव्यवस्था ५ व्या स्थानावर पोहोचली आहे. जगातील पतमानांकन संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवला आहे आणि आगामी काही काळात लवकरच भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ही मोदींची गॅरंटी आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
जागतिक परिस्थिती काही असली तरी भारताचा विकास झपाट्याने होत आहे
भारत जगासाठी आशेचा एक नवीन किरण म्हणून उदयास आला आहे. भविष्यातील तंत्रज्ञान, ग्रीन हायड्रोजन, सेमी-कंडक्टर यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर आमचे लक्ष आहे. जागतिक परिस्थिती काहीही असो, भारताचा विकास झपाट्याने होत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे आम्ही संरचनात्मक सुधारणांवर लक्ष केंद्रित करत आहोत. यात अनेकांनी भारताला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यासोबतच गुंतवणुकीच्या नवनवीन संधी देशात सातत्याने निर्माण होत आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईचे भरभरून कौतुक केले. फूड पार्कबाबत भारत आणि UAE सोबत करार करण्यात आला आहे. याशिवाय अनेक गुंतवणुकीच्या करारांवरही सहमती झाली आहे. भारत आणि यूएईमधील संबंध सातत्याने मजबूत होत आहेत. दोन्ही देशांनी ज्या प्रकारे आपले संबंध नवीन उंचीवर नेले आहेत, याचे मोठे श्रेय शेख मोहम्मद बिन जायेद यांना जाते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.