PM Narendra Modi Interview: राजधानी दिल्लीत G-20 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अर्थव्यवस्था, G20 शिखर परिषद आणि रेवडी संस्कृतीवर थेट भाष्य केले. भारताच्या G20 अध्यक्षपदामुळे अनेक सकारात्मक परिणाम मिळाले, यापैकी काही माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेत, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. तसेच, भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होईल; भ्रष्टाचार, जातीयवाद यांना आपल्या जीवनात स्थान नाही, असेही मोदी म्हणाले.
दोन अब्ज कुशल हातांचा देशपीटीआयशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'जगाचा जीडीपी-केंद्रित दृष्टिकोन आता मानव-केंद्रित दृष्टिकोनात बदलत आहे आणि यामध्ये भारत महत्वाची भूमिका बजावतोय. जगाने G20 मधील आपले शब्द आणि दृष्टी केवळ कल्पना म्हणून नाही, तर भविष्यासाठी एक रोडमॅप म्हणून पाहिला आहे. पूर्वी भारताला एक अब्ज भुकेल्या पोटांचा देश म्हणून पाहिले जात होते. आता भारत हा एक अब्ज महत्त्वाकांक्षी आणि दोन अब्ज कुशल हातांचा देश आहे. सर्वांना विश्वास आहे की, भारताची प्रगती अपघाती नाही, तर एका चांगल्या रोडमॅपचा परिणाम आहे.'
भारत पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेलभारताच्या अर्थव्यवस्थेबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र असेल. लवकरच भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल. आज भारतीयांना विकासाचा पाया घालण्याची मोठी संधी आहे.' यावेळी अरुणाचल प्रदेश आणि काश्मीरमधील जी-20 बैठकीवर चीन आणि पाकिस्तानचे आक्षेप फेटाळून लावत ते म्हणाले की, 'देशाच्या प्रत्येक भागात बैठका आयोजित होणार.'
रेवडी संस्कृतीवर टीकाया मुलाखतीत पीएम मोदींनी रेवडी संस्कृतीवरही निशाणा साधला. पीएम मोदींच्या म्हणण्यानुसार, 'बेजबाबदार आर्थिक धोरणे आणि लोकवाद अल्पावधीत राजकीय परिणाम देऊ शकतात, परंतु दीर्घकाळासाठी त्याची मोठी आर्थिक आणि सामाजिक किंमत चुकवावी लागेल. बेजबाबदार आर्थिक धोरणे आणि लोकवादी आश्वासनांचा सर्वाधिक त्रास सर्वात गरीब आणि असुरक्षित वर्गाला होतो. महागाईशी लढण्यासाठी योग्य वेळी योग्य धोरणे आणि त्याचा स्पष्ट संदेश जनतेला देणे आवश्यक आहे,' असंही मोदी यावेळी म्हणाले.