मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) 90 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुंबईतील कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. आरबीआयचा गेल्या 90 वर्षातील प्रवासाचा कार्यक्रम नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, दहा वर्षांपूर्वी बँकिंग क्षेत्र खूप तणावात होते. पण आता बँकिंग व्यवस्था नफ्यात आहे आणि विक्रमी पातळीवर कर्ज देत आहे. भारतीय बँकिंग क्षेत्रातील बदल हा केस स्टडी आहे.
केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, जेणेकरून त्या बँकांचे पुनरुज्जीवन करता येईल. यूपीआयला आता जगभरात ओळख मिळत आहे. आरबीआय सेंट्रल बँक डिजिटल चलनावरही काम करत आहे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. तसेच, नरेंद्र मोदींनी सुलभ बँकिंग आणि कर्जाची सुलभ उपलब्धता यावरही भर दिला.
नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत जे काही झाले, तो केवळ ट्रेलर होता. आपल्याला देशाला अजून पुढे न्यायचे आहे आणि बरेच काही करायचे आहे. सध्या जे आरबीआयशी संबंधित आहेत, त्यांना मी खूप भाग्यवान समजतो. आज तुम्ही बनवलेली धोरणे आणि तुम्ही करत असलेले काम आरबीआयच्या पुढील दशकाची दिशा ठरवेल. हे दशक या संस्थेला शताब्दी वर्षापर्यंत घेऊन जाणारे दशक आहे आणि हे दशक विकसित भारताच्या संकल्प प्रवासासाठी तितकेच महत्त्वाचे आहे.
#WATCH | Mumbai: At the commemoration ceremony of 90 years of the Reserve Bank of India, PM Modi says, "The tourism sector is growing very rapidly in India. The tourism sector is growing and the whole world wants to come to India, see India and understand India... In the coming… pic.twitter.com/Eiqz2szHlz
— ANI (@ANI) April 1, 2024
भारताच्या बँकिंग व्यवस्थेला झाला फायदा
नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, जेव्हा मी 2014 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या 80 व्या वर्षाच्या कार्यक्रमाला आलो होतो, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. भारतातील संपूर्ण बँकिंग क्षेत्र समस्या आणि आव्हानांना तोंड देत होते. एनपीएबाबत भारताच्या बँकिंग व्यवस्थेची स्थिरता आणि भवितव्य याबाबत प्रत्येकाच्या मनात भीती होती. आज भारताची बँकिंग व्यवस्था जगात एक मजबूत आणि टिकाऊ व्यवस्था म्हणून गणली जात आहे. तसेच, एकेकाळी कोलमडण्याच्या मार्गावर असलेली बँकिंग व्यवस्था आता नफ्यात आली असून कर्ज देण्यामध्ये विक्रमी वाढ झाली आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
आरबीआयच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 एप्रिल 2024 रोजी 90 व्या वर्षात पदार्पण करत आहे. आरबीआयच्या 90 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.