गेल्या काही वर्षांत भारत एक नवीन जागतिक उत्पादन केंद्र (Global Manufacturing Hub) म्हणून उदयास येत आहे. अनेक बड्या अमेरिकन कंपन्या आता चीनऐवजी भारतात आपले उत्पादन केंद्र बनवण्यावर भर देत आहेत. अॅपल (Apple) आणि गुगलनंतर (Google) आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे नाव लवकरच या यादीत जोडलं जाणार आहे.
आपली इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला भारतात लवकरात लवकर गुंतवणूकीच्या संधींच्या शोधात आहे. शक्य तितक्या लवकर गुंतवणूक केली जाईल, अशी प्रतिक्रिया टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान मस्क आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा झाली. इलॉन मस्क यांनी त्यांच्या कंपनीच्या या निर्णयाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.
मोदी अमेरिका दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं, विशेषत: गुंतवणुकीच्या दृष्टीने त्यांचा हा अमेरिकेचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात सरकारी अधिकाऱ्यांशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक अमेरिकेतील उद्योजक आणि सीईओंना भेटणार आहेत. यादरम्यानच मस्क आणि मोदींची भेट झाली.
पुढील वर्षी भारतात येणार
इलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर टेस्लाच्या भारतातील गुंतवणूक योजनांबद्दल भाष्य केलं. पत्रकारांनी त्यांना टेस्लाच्या भारतातील गुंतवणुकीच्या योजनेबद्दल प्रश्न विचारले. टेस्ला लवकरच भारतात येईल आणि पुढील वर्षी आपण भारताचा दौरा करू शकतो, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
पंतप्रधानांच्या समर्थनासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि लवकरत काही निर्णय होईल अशी आशा व्यक्त करतो. याला फार कालावधी लागणार नाही. सौर ऊर्जा, बॅटरी, इलेक्ट्रीक व्हेईकलसह शाश्वत ऊर्जेच्या बाबतीत भारतात अनेक संधी असल्याचे ते म्हणाले. याशिवाय लवकरच स्टारलिंकची सॅटलाईट इंटरनेट सेवाही भारतात सुरू होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.