pm kisan scheme : देशातील ९.८ कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. PM किसान सन्मान योजनेचा १९वा हप्ता कधी येणार याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना १९वा हप्ता जारी करतील. या अंतर्गत, सुमारे २२,००० कोटी रुपये हस्तांतरित केले जातील. पीटीआयच्या बातमीनुसार, पीएम-किसान योजनेअंतर्गत, प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दर चार महिन्यांनी २,००० रुपयांच्या ३ समान हप्त्यांमध्ये ६,००० रुपयांचा वार्षिक लाभ दिला जातो.
बिहारमधील भागलपूरवरुन करणार जारी
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली. चौहान म्हणाले, की २४ फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूर येथी एका कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी पीएम किसानचा १९वा हप्ता जारी केला करतील. ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. फेब्रुवारी २०१९ मध्ये लाँच करण्यात आलेली पीएम किसान ही जगातील सर्वात मोठी डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे आणि खते खरेदीसाठी लागणारा खर्च भागवण्यास मदत झाली आहे.
वर्षाला मिळतात ६००० रुपयेशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशातून सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, प्रत्येक लाभार्थीला दर चार महिन्यांनी २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ६,००० रुपयांचा वार्षिक लाभ मिळतो. सरकारने आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) अंतर्गत एकूण ३.४६ लाख कोटी रुपये वितरित केले आहेत.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार कटीबद्धचौहान म्हणाले की, उत्पन्न वाढवणे, शेती खर्च कमी करणे यासह नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. भागलपूरमधील कार्यक्रमाविषयी माहिती देताना चौहान म्हणाले की, सुमारे २.५ कोटी शेतकरी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी होण्याची अपेक्षा आहे. बिहारचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि राज्याशी संबंधित केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.