Join us

सरकारच्या 'या' योजनेत हमीशिवाय मिळते कर्ज, करावे लागेल फक्त 'हे' काम 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 12:41 PM

PM Svanidhi Scheme : कोरोनाच्या काळात देशातील गरीब वर्ग आणि रस्त्यावरील विक्रेते किंवा छोटे व्यावसायिक यांना दिलासा देण्यासाठी सरकारची पीएम स्वनिधी योजना खूप प्रभावी ठरली आहे.

नवी दिल्ली : तुम्हाला एखादा छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुम्हाला पैशांची अडचण येत असेल. तर तुम्ही बँकेतून कर्ज घेण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला तेथे हमी म्हणून काहीतरी जमा करण्यास सांगितले जाते. त्यामुळे काळजी करू नका, सरकारची एक योजना तुमची समस्या सोडवू शकते. दरम्यान, आम्ही पीएम स्वनिधी योजनेबद्दल (PM Svanidhi Scheme) बोलत आहोत. ही अशी योजना आहे, ज्यामध्ये सरकार गरजूंना 10 ते 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देते, तेही कोणत्याही हमीशिवाय.

कोरोनाच्या काळात देशातील गरीब वर्ग आणि रस्त्यावरील विक्रेते किंवा छोटे व्यावसायिक यांना दिलासा देण्यासाठी सरकारची पीएम स्वनिधी योजना खूप प्रभावी ठरली आहे. महामारीमुळे व्यवसाय बंद पडल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी आणि पुन्हा कामाला लागण्यासाठी 'पंतप्रधान स्वनिधी योजना' सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत सरकारकडून अशा गरजू लोकांना 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंत कर्ज सुविधा पुरविली जाते.

या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याअंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही हमी देण्याची गरज नाही. सरकार हमीशिवाय ठराविक रकमेचे कर्ज देते. अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, ती मंजूर होताच, कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात तीन वेळा ट्रान्सफर केली जाते. पीएम स्वनिधी योजनेंतर्गत घेतलेल्या कर्जाची रक्कम एका वर्षाच्या कालावधीत परत केली जाऊ शकते. याशिवाय, दरमहा हप्त्याने कर्ज फेडण्याची सुविधाही या योजनेत देण्यात आली आहे.

या योजनेत दिलेल्या कर्जावर 7 टक्के दराने व्याज आकारले जाते. या अंतर्गत गरजूंना 10 हजार रुपयांचे कर्ज मिळते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे सरकार कर्जावर सबसिडी देखील देते. कर्जाची परतफेड झाल्यावर दुप्पट रक्कम दुसऱ्यांदा कर्ज म्हणून घेता येते. दुसरीकडे, जर एखाद्या रस्त्यावरील विक्रेत्याने कर्जाच्या ईएमआयची ताबडतोब परतफेड केली आणि आवश्यक प्रमाणात डिजिटल व्यवहार केले तर, व्याज अनुदान आणि कॅशबॅक मिळाल्यामुळे कर्जाची रक्कम व्याजमुक्त होते.

या योजनेंतर्गत दिले जाणारे कर्ज हे तारणमुक्त कर्ज (Collateral Free Loan) आहे, म्हणजेच हमीशिवाय मोफत व्यवसाय कर्ज आहे. तुम्हाला पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच, या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करू शकता. बँकेत पोहोचल्यानंतर तुम्हाला तेथून पीएम स्वनिधी योजनेचा फॉर्म भरावा लागेल. या फॉर्ममध्ये सर्व माहिती भरून, त्यासोबत आधार कार्डची प्रत जोडावी लागेल. त्यानंतर फॉर्ममध्ये दिलेली माहिती तपासून बँक कर्ज मंजूर करेल. कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला कर्जाचे पैसे हप्त्यांमध्ये मिळण्यास सुरुवात होईल.

टॅग्स :व्यवसाय