Lokmat Money > बिझनेस न्यूज > थकीत कर्ज वाढल्यानेच पीएमसी बँक अडचणीत

थकीत कर्ज वाढल्यानेच पीएमसी बँक अडचणीत

अडचणीत आणणाऱ्या कर्जप्रकरणांची चौकशी सुरू; वाढू शकतो निर्बंधाचा कालावधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 01:50 AM2019-09-26T01:50:44+5:302019-09-26T01:50:57+5:30

अडचणीत आणणाऱ्या कर्जप्रकरणांची चौकशी सुरू; वाढू शकतो निर्बंधाचा कालावधी

PMC Bank is in trouble due to the increase in outstanding loans | थकीत कर्ज वाढल्यानेच पीएमसी बँक अडचणीत

थकीत कर्ज वाढल्यानेच पीएमसी बँक अडचणीत

- सोपान पांढरीपांडे

नागपूर : थकित कर्ज एका वर्षात १६७ कोटीने वाढल्याने पंजाब महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह (पीएमसी) बँक अडचणीत आल्यानेच रिझर्व्ह बँकेच्या व्यवहारावर निर्बंध टाकले आहेत. बँकेचे थकित कर्ज ३१ मार्च २०१८ रोजी १४८ कोटी व एकूण कर्जाच्या फक्त १.०५ टक्के होते. हेच थकित कर्ज ३१ मार्च २०१९ च्या ताळेबंदानुसार तब्बल ३१५ कोटीवर पोहचले आहे.

नियमानुसार बँकांना थकित कर्जाची पूर्ण तरतूद त्या वर्षीच्या नफ्यातून करावी लागते. पीएमसी बँकेला २०१८-१९ या वर्षात २४४.४६ कोटी ढोबळ नफा झाला. परंतु त्यातून ३१५ कोटीची तरतूद अशक्य असल्याने बँकेने फक्त ९९ कोटींची तरतूद केली.

२०१९ च्या ताळेबंदाप्रमाणे बँकेजवळ ११६०० कोटीच्या ठेवी (९३०० कोटी मुदत व २३०० कोटी बचत ठेवी) आहेत. बँकेने ८३८३ कोटींचे कर्जवाटप केले. बँकेचे भाग भांडवल २९२.६१ कोटी व राखीव निधी ९३३ कोटी आहे. यावर्षी बँकेने आपली १०५ कोटीची थकित कर्जे सीएफएम असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला विकल्याची चर्चा आहे. ती खरी असेल तर हा व्यवहार अत्यंत संशयास्पद आहे.

एका वृत्तवाहिनीला मुलाखतीत पीएमसी बँकेचे प्रबंध संचालक जॉय थॉमस यांनी बँकेची आर्थिक स्थिती सुदृढ असून ठेवीदारांचा पैसा सुरक्षित आहे असे म्हटले. पण थकित कर्ज वाढल्याने अडचणीत आल्याचेही मान्य केले. पण नेमक्या कोणत्या कर्जप्रकरणांमुळे बँक अडचणीत आली ते सांगण्यास त्यांनी नकार दिला. याचीच चौकशी आता सुरु आहे.

बँकेवर सध्या सहा महिन्यांकरिता निर्बंध लावले आहेत. पण हा कालावधी वाढू शकतो. या काळात थकित कर्ज वसुलीचा प्रयत्न केला जाईल अन्यथा बँकेचे दुसºया सक्षम बँकेत विलीनीकरण केले जाईल. हे ही न जमल्यास बँक नादार घोषित होईल. भारतीय बँकांमधील एक लाखापर्यंतच्या ठेवींना डिपॉझीट इन्शुरन्स व क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनचे विमा संरक्षण आहे. बँक दिवाळखोरीत गेली तरी ठेवीदारांना उशिरा का होईना ही रक्कम परत मिळते. एक लाखापेक्षा आर्थिक रकमेच्या ठेवीदारांनी मात्र विवेकाने निर्णय घ्यावा लागेल.

पीएमसी बँकेची आर्थिक स्थिती (रु. कोटी)
                          ३१ मार्च २०१८      ३१ मार्च २०१९
भाग भांडवल          २९४.२२              २९२.६१
राखीव निधी            ८१४.८०              ९३३.९४
ठेवी                      ९९३८.८५          ११६१७.३४
कर्जवाटप             ७४२८.०८           ८३८३.३३
ढोबळ नफा            २११.८१              २४४.४६
निव्वळ नफा           १६९.६७            १५६.२८

Web Title: PMC Bank is in trouble due to the increase in outstanding loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.