Join us

कर्जबुडव्या विजय मल्ल्याची संपत्ती जप्त होणार, मुंबईतील पीएमएलए कोर्टाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 12:39 PM

उद्योगपती विजय मल्ल्या याला नववर्षाच्या सुरुवातीलाच कोर्टाने जबरदस्त धक्का दिला आहे.

मुंबई - बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पसार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याला नववर्षाच्या सुरुवातीलाच कोर्टाने जबरदस्त धक्का दिला आहे. बँकांचे थकित येणे वसूल करण्यासाठी कर्जबुडव्या विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्यास मुंबईतील पीएमएलए कोर्टाने परवानगी दिली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील पीएमएलए कोर्टाने कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना बँकांचे थकित येणे वसूल करण्यासाठी त्याची संपत्ती जप्त करण्यास परवानगी दिली आहे. मात्र मल्ल्या याला या निर्णयाविरोधात वरच्या कोर्टात अपील करता यावे यासाठी कोर्टाने आपल्या निर्णयाच्या अंमलबजावणीस 18 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे.  

एकेकाळी देशातील बड्या उद्योगपतींमध्ये समावेश असलेल्या विजय मल्ल्या याने मद्यनिर्मिती आणि हवाई वाहतूक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता. त्याचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने होते. मल्ल्याचा किंगफिशर हा ब्रँड जगप्रसिद्ध झाला होता. मात्र काही काळाने त्याची किंगफिशर एअरलाइन्स डबघाईला आली. नंतर  विजय मल्ल्या देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घालून देशाबाहेर परागंदा झाला. सध्या तो इंग्लंडमध्ये वास्तव्यास असून, त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच त्याच्याविरोधात भारतातील विविध कोर्टांमध्येही खटले सुरू आहेत. 

टॅग्स :विजय मल्ल्यान्यायालय