Join us  

खिशाला आणखी कात्री! मोदी सरकारने PMSBY चे नियम बदलले; प्रीमियम ६७ टक्के वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 2:44 PM

या योजनेचा लाभ तुम्हीही घेऊ शकता. पण कसा? जाणून घ्या...

नवी दिल्ली: जवळपास प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्याची, सुरक्षेची काळजी घेत असते. जो-तो आपापल्यापरिने विमा योजना घेत असतो. देशभरात अनेकविध कंपन्या नाना प्रकारच्या विमा योजना ऑफर करत असतात. केंद्र सरकारही सर्वसामान्य देशवासीयांसाठी अनेक योजना सादर करत असते. यामध्ये सुरक्षेविषयीच्या योजनांचाही समावेश आहे. यापैकी एक म्हणजे पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY). केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये काही बदल केले असून, त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता.

गेल्या काही दिवसांपासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १ जूनपासून अनेकविध गोष्टींच्या किमती, योजनांचे नियम बदलले आहेत. यामध्ये पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा समावेश आहे. केंद्र सरकारने १ जूनपासून या योजनेच्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे. आता या योजनेचा वार्षिक प्रीमियम १२ रुपयांवरून २० रुपये केला आहे. या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला २ लाखांचा मृत्यू विमा देते. म्हणजेच, या अंतर्गत २ लाख रुपयांचे कव्हर उपलब्ध आहे, तर १ लाख रुपये वेगवेगळ्या परिस्थितीत उपलब्ध आहेत.  

सुरक्षा योजना घेण्यासाठी नेमके काय करावे?

- ऑनलाइन किंवा बँकेला भेट देऊन पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा फॉर्म भरू शकता.

- हा विमा तुम्ही कोणत्याही बँकेतून घेऊ शकता. सार्वजनिकसह खासगी बँकांच्या वेबसाइटवरही या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे. बँक खात्यातून पैसे थेट डेबिट केले जातात.

- हा फॉर्म इंग्रजी, हिंदी, गुजराती, बंगाली, कन्नड, ओडिया, मराठी, तेलगू आणि तमिळ भाषांमध्ये उपलब्ध आहे. तुमचे बचत खाते असलेल्या बँकेत जाऊन तुम्हाला हा फॉर्म सबमिट करावा लागेल.

- प्रीमियमसाठी, तुम्हाला बँक फॉर्ममध्ये मंजूरी द्यावी लागेल की, तुमच्या खात्यातून प्रीमियमची रक्कम आपोआप कापली जाईल. बँका दरवर्षी १ जून रोजी तुमच्या खात्यातून प्रीमियमची रक्कम आपोआप कापून घेतील.

- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असावे. त्याच वेळी, जास्तीत जास्त ७० वर्षांपर्यंतचा विमा दिला जाऊ शकतो. 

- या सुरक्षा विमा योजनेत अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये दिले जातात. 

- दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावणे किंवा एक डोळा आणि एक हात किंवा एक पाय गमावणे यासारख्या अपघातामुळे झालेल्या कायमस्वरूपी अपंगत्वासाठी २ लाख रुपये दिले जातील.

- एका डोळ्यातील दृष्टी कमी होणे, किंवा एक हात किंवा पाय गमावणे यासारख्या अपघातामुळे कायमचे आंशिक अपंगत्व आल्यास १ लाख रुपये दिले जातील. 

टॅग्स :केंद्र सरकार