Join us

PNB Payment Rules : बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, 4 एप्रिलपासून पेमेंटचे नियम बदलणार; जाणून घ्या, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 10:59 AM

PNB Payment Rules : पंजाब नॅशनल बँकेची अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल 2022 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू केली जाईल.

नवी दिल्ली : देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी कर्ज देणारी पंजाब नॅशनल बँक (PNB) ग्राहकांसाठी पेमेंट नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करणार आहे. दरम्यान, पंजाब नॅशनल बँक 4 एप्रिल 2022 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Pay system) लागू करणार आहे. या अंतर्गत, व्हेरिफिकेशनशिवाय चेक पेमेंट (Cheque payment) होणार नाही. नियमानुसार, व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी आढळल्यास चेक परत केला जाईल.

पंजाब नॅशनल बँकेची अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल 2022 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू केली जाईल. यानंतर, ग्राहकाने शाखा किंवा डिजिटल चॅनलद्वारे 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा चेक जारी केल्यास पॉझिटिव्ह पे सिस्टम (PPS) कंफर्मेशन अनिवार्य असेल.

ग्राहकांना अकाउंट नंबर, चेक नंबर, चेक अल्फा, चेकची तारीख, चेकची रक्कम आणि लाभार्थीचे नाव द्यावे लागेल. पंजाब नॅशनल बँकेने म्हटले आहे की, ग्राहक 1800-103-2222 किंवा 1800-180-2222 वर कॉल करून पॉझिटिव्ह पे सिस्टमची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. तसेच, ग्राहक बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे देखील संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतात.

रिझर्व्ह बँकेने 1 जानेवारी 2022 पासून फसवणूक शोधणारे टूल पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्याचे निर्देश दिले होते. आतापर्यंत अनेक बँकांनी त्याची अंमलबजावणी केली आहे. पॉझिटिव्ह पे सिस्टमच्या मदतीने चेक पेमेंट सुरक्षित होईल. तसेच, चेक क्लिअरन्ससाठी कमी वेळ लागेल. चेक घेऊन जागोजागी भटकावे लागणार नाही.

पॉझिटिव्ह पे सिस्टम फसवणूक कशी रोखेल?पॉझिटिव्ह पे सिस्टम अंतर्गत, चेक जारी करणाऱ्याला एसएमएस, मोबाइल अॅप, नेट बँकिंग किंवा एटीएमद्वारे बँकेला चेक डिटेल्स द्यावे लागतील. चेक बँकेत पोहोचल्यावर खातेदाराने दिलेल्या माहितीचे व्हेरिफिकेशन केले जाईल. या दरम्यान काही तफावत आढळल्यास चेक नाकारला जाईल. पंजाब नॅशनल बँकेने म्हटले आहे की, पॉझिटिव्ह पे सिस्टम कंफर्मेशन झाले नाही तर चेक परत केला जाईल.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँकबँक