नवी दिल्ली : देशातील वाढत्या महागाईदरम्यान आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जर तुम्ही पीएनबीचे (PNB) ग्राहक असाल आणि गृहकर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेनंतर आता पीएनबी हाउसिंग फायनान्सने (PNB Housing) सुद्धा कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. यावेळी पीएनबी हाऊसिंगने गृहकर्जासह अनेक किरकोळ कर्जावरील व्याजदरात 35 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.35 टक्के वाढ केली आहे.
नवे दर आजपासून म्हणजेच 9 मेपासून लागू झाले आहेत. पीएनबी हाउसिंग अंतर्गत, ग्राहकांना घर बांधणे आणि घर खरेदी दोन्हीसाठी कर्ज मिळते. यामध्ये रिटेल आणि कॉर्पोरेट या दोघांचाही हिस्सेदारी आहे. मात्र आता यासाठी ग्राहकांना जास्त ईएमआय द्यावा लागणार आहे. याशिवाय नवीन कर्जदारांना जास्त व्याज द्यावे लागणार आहे. यापूर्वी पीएनबी बँकेनेही आपले व्याजदर वाढवले होते.
बँकेने दिली माहितीपीएनबी हाउसिंगने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार नवीन व्याजदर वेगवेगळ्या तारखांपासून लागू होणार आहेत. नवीन ग्राहकांसाठी रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 7 मे 2022 पासून लागू होईल. याचबरोबर, सध्याच्या ग्राहकांसाठी रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 1 जून 2022 पासून 6.90 टक्के असणार आहे. यापूर्वी पीएनबीनेही व्याजदर वाढवले आहेत. याअंतर्गत व्याजदर 0.40 टक्क्यांनी वाढवून 6.90 टक्के करण्यात आला आहे. दरम्यान पीएनबीने शेअर बाजाराला कळवले आहे की, 1 जून 2022 पासून विद्यमान ग्राहकांसाठी रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 6.50 टक्क्यांवरून 6.90 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
आरबीआयकडून रेपो दरात वाढ4 मे रोजी आरबीआयने रेपो दर 4 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. जागतिक बाजारात वस्तूंच्या वाढत्या किमती आणि पेट्रोल व डिझेलसह इतर इंधनांच्या वाढत्या दबावामुळे आम्हाला रेपो दरात बदल करावा लागत आहे, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले होते. त्यानंतर बँकांकडून व्याजदरातही वाढ करण्यात येत आहे. आतापर्यंत आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडियानेही रेपो आधारित व्याजदरात वाढ केली आहे.