नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्याची केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) चौकशी सुरू केली असून, आर्थिक नियमावली असताना घोटाळा झालाच कसा, याची माहिती १0 दिवसांत सादर करा, असे आदेश बँक व अर्थ मंत्रालयाला दिले आहेत. ब्रॅडी हाउसमधील कार्यालयही सील करण्यात आले आहे. या घोटाळ्यात अनेक बँकांचा पैसा गुंतला असल्याने घोटाळा ३0 हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता प्राप्तिकर विभागाला वाटत असल्याचे कळते. त्यात पीएनबी वगळता अन्य बँकांना २0 हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.
एकाच ठिकाणी तीन वर्षांपासून काम करणारे अधिकारी व पाच वर्षांपासून काम करणारे कर्मचारी यांच्या बदल्या करण्याच्या सूचना सीव्हीसीने दिल्या आहेत.
नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे, औरंगाबाद, ठाणे, कोलकाता, दिल्ली, जम्मू, लखनऊ, बंगळुरू आणि सुरतसह ३८ ठिकाणी ‘ईडी’ने सोमवारी धाडी घातल्या. वरळीच्या ‘समुद्र महल’मधील मोदीच्या घराचीही झडती घेतली. मोदी व मेहुल चोक्सी यांच्या आणखी २२ कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या. आतापर्यंत ५,७१६ कोटी रुपये कोटींची मालमत्ता जप्त झाली आहे.
तपासासाठी ‘ईडी’चे संचालक कर्नाल सिंग मुंबईत आले आहेत. मोदीच्या कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी विपुल अंबानी यांची सोमवारी सीबीआयने चौकशी केली. ते धीरूभाई अंबानी यांचे पुतणे आहेत. तसेच २०१३ ते २०१७ या काळात ज्या २४ कंपन्या आणि १८ व्यावसायिकांनी या ज्वेलरीची फें्रचायसी घेतली होती, त्यांनीही तक्रार दिली आहे.