मुंबई - पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) तब्बल 11 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीविरोधात अभिनेत्री प्रियांका चोप्राने कायदेशीर नोटीस बजावली आहे. जानेवारी 2017 मध्ये प्रियांका नीरव मोदीच्या जाहिरातींची ब्रँड अॅम्बेसिडर झाली होती. त्यानंतर ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत नीरव मोदीच्या काही जाहिरातींमध्येही झळकली. मात्र, यासाठी झालेल्या करारानुसार मानधन न मिळाल्याचा ठपका ठेवत प्रियांकाने ही नोटीस बजावली असल्याची माहिती प्रियंका चोप्राच्या मॅनेजरने दिली आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत.
फर्स्टपोस्टच्या वृत्तानुसार, आपली प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून सिद्धार्थ मल्होत्राही नीरव मोदीसोबत झालेला जाहिरातीचा करार मोडणार आहे. सिद्धार्थ नीरव मोदीचे आणखी दोन जाहिराती शूट करणार होता, पण हा घोटाळा समोर आल्याने तो कंपनीसोबतचा करार मोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Actress @priyankachopra Manager message on #Niravmodi#PNBScam ;
— Mrityunjay Singh™ (@kunwarmritunjay) February 15, 2018
"Priyanka Chopra has already cut off ties with Nirav Modi. She and her team had blamed him for non-payments for their endorsement deals" @abpmajhatv@abpnewshindi@milindkhandekar@anjujuneja@sansaniABP
कोण आहे नीरव मोदी -
नीरव मोदीची फायरस्टार डायमंड ही कंपनी आहे. त्याला 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत. नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा 'नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. 47 वर्षीय नीरवचे वडील देखील हिरेव्यापारीच होते. नीरव वॉर्टन महाविद्यालयात शिकत असतानाच वडिलांचा व्यवसाय थंडावला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममध्ये परतावे लागले. यानंतर नीरव मोदी भारतात आला. नीरवला भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.
काय आहे प्रकरण -
सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला आहे. घोटाळ्यात संशयित असलेले बडे व प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तिघे देश सोडून फरार झाला. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत हा घोटाळा झाल्याचे काल उघड झाले. हिरे व्यापारी नीरव मोदीने आपल्या मित्रांच्या सहाय्यानं पँजाब नॅशनल बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आज शेअर बाजारात बँकेचे शेअर जोरदार कोसळले. त्यामुळे पीएनबीने मुंबई शेअर बाजाराला पत्र लिहिलं. घोटाळ्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सक्तवसुली संचलनालयाने याप्रकरणी घोटाळ्याचा सुत्रधार आणि प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी याच्या कार्यालयांवर छापेमारी सुरु झाली आहे. नीरव मोदी याच्या मुंबईतसहित तीन शहरांमधील शोरुम आणि कार्यालयांवर छापेमारी झाली आहे .
बँकेचे स्पष्टीकरण -
आम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालणार नाही. आम्हाला थोडा वेळ द्या, बँक पूर्ण क्षमतेने दोषींवर कारवाई करत आहे, ग्राहक असो वा कर्मचारी गैरव्यवहार करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करणार असल्याचे आज पंजाब नॅशनल बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं. नवी दिल्ली येथे आज पंजाब नॅशनल बँकचे एमडी सुनिल मेहता यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली. 123 वर्षांत पीएनबीने अनेक चढउतार पाहिले आहेत. 2011 मध्ये घोटाळ्याची माहिती मिळाली तेव्हा संबंधित यंत्रणांना माहिती दिली आणि चौकशी सुरु केली होती. बँकेची विश्वासार्हता धोक्यात आणणार नाही त्यामुळं खातेदारांनी निश्चिंत रहावे, प्रत्येक दोषींवर बँक कारवाई करण्यास सक्षम असल्याचे सुनिल मेहता यांनी स्पष्ट केलं.
मल्ल्यापेक्षाही मोठा घोळ
याबाबत सीबीआयच्या सूत्रांनी स्पष्ट माहिती देण्यास नकार दिला. मात्र आधी २८० कोटी रुपये व आता ११,५०० कोटी रुपये, या दोन्ही घोटाळ्यांची कार्यपद्धती सारखीच आहे. त्यामुळे आता सीबीआयने या संपूर्ण घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे. हा विजय मल्ल्यापेक्षाही मोठा बँक घोटाळा आहे, असे सांगण्यात आले.
तीन बँका संकटात
या घोटाळ्यात संबंधितांनी विदेशात राहून अन्य बँकांकडून कर्जे घेतल्याचे पंजाब नॅशनल बँकेने पत्रात नमूद केले आहे. अन्य बँकांमध्ये अलाहाबाद बँक, युनियन बँक आॅफ इंडिया व खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेचा समावेश असल्याचे बोलले जाते.
सर्वसामान्यांची रक्कम धोक्यात
पीएनबीमध्ये रिझर्व्ह बँक व सर्वसामान्य ठेवीदार यांच्यामार्फत पैसा येतो. समभागधारकांचाही पैसा बँकेत आहे. घोटाळ्याची तक्रार करताना बँकेने ‘संशयास्पद व्यवहार’ असा उल्लेख केला आहे. ही खाती सर्वसामान्य ठेवीदारांची असून घोटाळा केलेल्यांची नावेही बँकेला माहीत नाहीत.